‘या’ मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाचं सरकार; ७० वर्षाचा इतिहास बनला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 11:06 AM2021-09-26T11:06:05+5:302021-09-26T11:09:12+5:30
गंगोत्री विधानसभा मतदारसंघातून ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो त्याच पक्षाचं सरकार राज्यात स्थापन होतं. नेमकं यामागचा इतिहास काय आहे?
उत्तराखंडच्या आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने बाकी राहिले आहेत. या पहाडी राज्यात कुणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. सरकार कुणाचंही येवो पण सध्या एक मुद्दा येथील राज्यात चांगलाच गाजताना दिसत आहे. हा योगायोग म्हणा अथवा चमत्कार परंतु देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत ही घटना घडत आहे. ही चर्चा आहे गंगोत्री विधानसभा मतदारसंघाची..! (Gangotri Assembly Seat)
गंगोत्री विधानसभा मतदारसंघातून ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येतो त्याच पक्षाचं सरकार राज्यात स्थापन होतं. नेमकं यामागचा इतिहास काय आहे? कधीपासून हा राजकीय चमत्कार घडत आहे? हे जाणून घेऊया. गंगोत्री विधानसभा मतदारसंघात १९५२ पासून आजतागायत ज्या पक्षाचा उमेदवार निवडून आला त्याचा पक्ष सत्तेत आला आहे. गंगोत्री विधानसभा मतदारसंघ २००० मध्ये निर्माण झाला. उत्तराखंड राज्याची स्थापना होण्यापूर्वी हा मतदारसंघ उत्तरकाशी म्हणून ओळखला जायचा. २००० मध्ये उत्तराखंड उत्तरप्रदेशमधून विभाजन होऊन बनला. नव्या राज्यात उत्तरकाशीचे ३ मतदारसंघ तयार झाले. पुरोला, गंगोत्री आणि यमुनोत्री विधानसभा मतदारसंघ बनले. (Uttarakhand Assembly Election 2022)
उत्तरप्रदेशात झालेल्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून चमत्कार
१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून उत्तरप्रदेशात १९५२ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढवली गेली. तेव्हा गंगोत्री उत्तरकाशी विधानसभा मतदारसंघाचा भाग होता. त्यावेळी या जागेवरून जयेंद्र सिंह बिष्ट अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले. तेव्हा उत्तर प्रदेशात पं. गोविंद बल्लभ पंत यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकार बनलं.
१९५७ ते १९७४ काँग्रेस आमदार, काँग्रेस सरकार
१९५७ मध्ये विधानसभा निवडणुकीत जयेंद्र बिनविरोध निवडून आले. त्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. परंतु १९५८ मध्ये आमदार जयेंद्र यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे रामचंद्र उनियाल आमदार बनले. त्यानंतर १९६२, १९६७, १९६९, १९७४ या मतदारसंघात काँग्रेस आमदार जिंकले आणि राज्यात काँग्रेसचं सरकार आलं. तेव्हापासून हे चक्र सुरूच झालं.
१९७७ मध्ये पहिल्यांदाच बनलं जनता पार्टीचं सरकार
१९७७ मध्ये जनता पार्टीचे उमेदवार बर्फियालाल निवडणुकीत आमदार बनले तेव्हा उत्तर प्रदेशात जनता पार्टीचं सरकार बनलं. त्यानंतर १९८० आणि १९८५ मध्ये उत्तरकाशी मतदारसंघात काँग्रेस आमदार जिंकला तेव्हा राज्यात काँग्रेस सत्तेत आली. १९८९, १९९१, १९९६ आणि २००० पर्यंत या मतदारसंघाचा राजकीय चमत्कार असाच कायम होता.
उत्तराखंड राज्याच्या स्थापनेनंतरही प्रथा मोडली नाही
९ नोव्हेंबर २००० मध्ये उत्तराखंड राज्याची स्थापना झाली. तेव्हा उत्तरकाशी मतदारसंघाचे तीन भाग झाले. गंगोत्री मतदारसंघ त्यातलाच एक. २००२ मध्ये पहिल्या विधानसभा निवडणुकीत गंगोत्रीमधून काँग्रेसचे आमदार विजयपाल सजवाण निवडणुकीत जिंकले तेव्हा राज्यात काँग्रेसची सत्ता आली. २००७ मध्ये भाजपाचे गोपाळ सिंह निवडून आले तेव्हा भाजपा सत्तेत आली. त्यानंतर २०१२ मध्ये काँग्रेसचे विजयपाल सजवाण पुन्हा निवडून आले. तेव्हा विजय बहुगुणा यांच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेसची सत्ता आली.
२०२२ मध्ये प्रथा कायम राहणार की ७० वर्षाचा इतिहास बदलणार
२०१७ मध्ये गंगोत्री मतदारसंघातून भाजपाचे गोपाळ सिंह रावत आमदार बनले आणि राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता आली. परंतु २०२१ मध्ये आजारपणामुळे आमदार गोपाळ सिंह रावत यांचे निधन झाले आहे. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. आता २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे गंगोत्री मतदारसंघात कुठल्या पक्षाचा आमदार निवडून येणार आणि कुणाची सत्ता स्थापन होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.