लखनऊ: केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या बदलाची तयारी सुरु आहे. यामध्ये काही नवे चेहरेही आणि जुने अनुभवी नेत्यांची वर्णी लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे, सुरेश प्रभू यांच्याबरोबर ज्योतिरादित्य शिंदे, दिनेश त्रिवेदी, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, जमयांग सेरिंग नामग्याल यांच्यासह वरुण गांधींचाही (Varun Gandhi) समावेश आहे. वरुण गांधी हे उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधून भाजपाचे (BJP) खासदार आहेत. महत्वाचे म्हणजे ते नेहरू-गांधी कुटुंबाशी संबंधीत आहेत. त्यांना आक्रमकतेमुळे ओळखले जाते, जे काँग्रेसी विचारांच्या अगदी उलट आहे. त्यांना मंत्रिपद दिल्यास त्यांच्या हिंदुत्ववादी इमेजचा फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. (Prime Minister Narendra Modi will select new faces in his cabinet. )
वरुण गांधी हे भाजपाचे नेते आहेत. ते माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा मोठा मुलगा दिवंगत संजय गांधी यांचे पूत्र आहेत. वरुण यांचा जन्म 13 मार्च 1980 ला झाला आहे. त्यांची आई मेनका गांधी देखील मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. वरुण तीन महिन्यांचे असताना संजय गांधी यांचे निधन झाले होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीच्या ऋषी वल्ली आणि ब्रिटिश स्कूलमधून झाले. यानंतर त्यांनी यूनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये इकोनॉमिक्सचे शिक्षण घेतले आहे.
मेनका गांधी आधीपासूनच एनडीएमध्ये होत्या. परंतू २००४ मध्ये त्यांनी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला. १९९९ पासून प्रचारात उतरलेल्या वरुण यांना २००९ मध्ये पहिल्यांदा संधी मिळाली. पीलीभीतमधून ते मोठ्या बहुमताने निवडून आले. २०१३ मध्ये राजनाथ सिंह यांनी त्यांना भाजपाच राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्त केले. पक्षाच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा महासचिव आणि पश्चिम बंगालच्या प्रभारी पदाची जबाबदारी मिळाली होती. परंतू २०१४ च्या निवडणुकीनंतर एकेकरून त्यांची सर्व पदे काढून घेतली गेली. याचबरोबर खासदारांचे वेतन आणि रोहिंग्यांना निवाऱ्यावरून अनेक मुद्य्यांवर पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना समजही देण्यात आली होती.
हिंदूंना कोणी हात जरी लावला तरी त्याचा हात तोडण्याच्या वक्तव्यामुळे ते वादात सापडले होते. त्यांना त्यांच्या भाषणामुळे आक्रमक असल्याचे म्हटले जाते. त्यांची एकामागोमाग एक अशी वादग्रस्त भाषणे आल्याने पक्षाने त्यांना बाजुला केले होते. आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर वरुण गांधींचे कार्ड भाजपा खेळण्याची शक्यता आहे.