भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रदेश कार्यालयाच्या पोस्टरवरून माजी मुख्यमंत्र्यांचा फोटो हटवला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 06:05 PM2021-06-13T18:05:56+5:302021-06-13T18:07:19+5:30
अलीकडेच भाजपा प्रदेश मुख्यालयात जे मागील २० वर्षात कधीही झाली नाही अशी घटना घडली आहे.
जयपूर – राजस्थानच्या राजकीय वर्तुळात आता काँग्रेस पाठोपाठ भाजपामधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येताना दिसत आहे. एकीकडे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात वाद सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपामध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि सतीश पुनीया यांच्या गटात वाद आहे. अनेक वर्षापासून या दोघांमधील वादांवर पक्षाने पडदा टाकला आहे. परंतु वेळोवेळी यांचे वाद समोर आले आहेत.
अलीकडेच भाजपा प्रदेश मुख्यालयात जे मागील २० वर्षात कधीही झाली नाही अशी घटना घडली आहे. राजस्थान भाजपा मुख्यालयातील पोस्टरवरून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा फोटो गायब झाला आहे. त्यामुळे राजस्थान भाजपात सर्वकाही ठीक आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. राजस्थान भाजपा मुख्यालयात नवीन पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवरून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा फोटो हटवण्यात आला आहे. नव्या होर्डिग्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्याव्यतिरिक्त गुलाब चंद कटारिया आणि सतीश पुनिया यांचा फोटो लावण्यात आला आहे. तर दुसऱ्या होर्डिंगमध्ये दिनदयाल उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा फोटो लावले आहेत.
पोस्टर वादावर भाजपा काय म्हणाली?
राजस्थानच्या भाजपा पोस्टर वादावर पक्षाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले की, होर्डिंग्सवर कोणाचे फोटो लावावेत हे पक्षाच्या कमिटीचा निर्णय असतो. ते कोणत्याही नेत्याचे काम काम नाही. असे बदल होत राहतात. नवीन लोक येतात आणि जुने जातात ही परंपरा आहे.
वसुंधरा समर्थक नाराज
भाजपा आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भाग असणाऱ्या वसुंधरा राजे यांचा फोटो पोस्टरवरून हटवल्यामुळे समर्थक नाराज झाले आहेत. वसुंधरा राजे समर्थक म्हणतात की, राजस्थानात वसुंधरा राजे महत्त्वाच्या नेत्या आहेत. वसुंधरा राजे विना भाजपाला राजस्थानात सत्ता मिळवता येऊ शकत नाही. परंतु माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि भाजपा नेतृत्वामध्ये झालेल्या कलहानंतर वसुंधरा राजेंचा फोटो हटवला असल्याचं सांगितले आहे. पण यामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.