मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल दसरा मेळाव्यात घणाघाती भाषण करत भाजपचा जोरदार समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आलेल्या या मेळाव्यातील भाषणावर आता भाजपनं जोरदार टीका केली आहे. सावरकर सभागृहात भाषण करणारे मुख्यमंत्री सावरकरांबद्ल एकही शब्द का बोलले नाहीत? बहुधा त्यांना त्यांच्या नव्या मित्रांची भीती वाटत असावी, अशा शब्दांत भाजपनं मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलं. भाजपकडून होत असलेल्या या टीकेला आता शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.स्वातंत्रवीर सावरकर यांच्या अपमानावर शिवसेना कधीही गप्प बसलेली नाही आणि यापुढेही बसणार नाही. त्यासाठी हवं तर इतिहास चाळून पाहा. सावरकर शिवसेनेचे आदर्श आणि मार्गदर्शक आहेत. सावरकरांवरून शिवसेनेला प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी शिवसेनेच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं संजय राऊत म्हणाले. 'सावरकरांचा पुळका असल्याचं दाखवणारे त्यांना भारतरत्न का देत नाहीत? गेल्या ६ वर्षांत अनेकांना भारतरत्न दिले गेले. मग सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? त्यात कोणत्या अडचणी येत आहेत?', असे सवाल राऊत यांनी उपस्थित केले.
इतका पुळका आहे, तर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?; शिवसेनेचा भाजपला सवाल
By कुणाल गवाणकर | Published: October 26, 2020 12:49 PM