Maha Vikas Aghadi Seat Sharing conflict: महाविकास आघाडीत काही जागांवरून रस्खीखेच सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला विदर्भात काही जागा हव्या आहेत. पण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्या सोडायला तयार नसल्याचे सांगितले जाते. याबद्दलची नाराजी खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. त्यानंतर पटोलेंनी राऊतांना उपरोधिक भाषेत सुनावले आहे.
नाना पटोले म्हणाले, "आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. आम्ही समन्वयाने... आम्ही संयुक्त पत्रकार परिषद आज घेतली."
मला कुणीही अडवू शकत नाही-नाना पटोले
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्याबद्दल भूमिका मांडत असताना अनिल देसाई, जितेंद्र आव्हाडांनी अडवण्याचा प्रयत्न केला, असे नाना पटोलेंना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, "मी माझी भूमिका मांडली. त्यामुळे मला कुणीही अडवू शकत नाही. तुमचा गैरसमज होत असेल. माझी जी काही भूमिका आहे, ती माझ्या पक्षाच्या हिताने मांडणार, महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी मांडणार. त्यामुळे माध्यमांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आमच्यात कुठलेही भांडण नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे", असे नाना पटोले म्हणाले.
संजय राऊतांना उद्धव ठाकरेंसोबत बोलावंच लागत नसेल, पटोले बरसले
संजय राऊतांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, "संजय राऊत साहेब उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा मोठे असतील. त्यांना उद्धव ठाकरे साहेबांसोबत बोलावंच लागत नाही. त्यांनी केलेला निर्णय, त्यांचाच फायनल असेल, तर ते मोठे माणसं आहेत. आमच्या पक्षामध्ये एक प्रोटोकॉल आहे. हायकमांड आमचं दिल्लीत आहे. आम्हाला त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती द्यावी लागते. जयंत पाटील असतील तर त्यांना पवार साहेबांना माहिती द्यावी लागते. त्यांच्यात (शिवसेना यूबीटी) नसेल, तर तो त्यांचा भाग आहे", अशा उपरोधिक शब्दात पटोलेंनी संजय राऊतांना उत्तर दिले.