नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागांवर विजय मिळवल्यानंतर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) संघटनेचा आत्मविश्वास वाढला आहे. असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू आणि एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी संपूर्ण हिंदुस्तानात AIMIM चा झेंडा फडकणार असं म्हटलं आहे. बिहारमध्ये एआयएमआयएमच्या विजयानंतर हिंदुस्तानच्या राजकारणात नवी तारीख लिहिली जाईल असं म्हटलं आहे.
"एआयएमआयएम हिंदुस्तानात आपला झेंडा फडकावताना संपूर्ण जग पाहिल" अशी आशा अकबरुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केली आहे. बिहार विधानसभेचा निकाल आल्यानंतर एआयएमआयएमचे सगळे आमदार पाटण्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, पक्षाकडून आपल्या पाचही आमदारांना हैदराबादला आमंत्रित करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओवैसींना पक्षातील आमदार फुटण्याची भीती असल्याने आपल्या आमदारांना हैदराबादला बोलावलं आहे.
"मित्र आणि शत्रुंना ओळखा, आपल्या आणि परक्यांमध्ये फरक ओळखायला शिका"
अकबरुद्दीन ओवैसी यांनी बिहारमधील त्या पाच आमदारांची भेट घेतली आहे. "मित्र आणि शत्रुंना ओळखा, आपल्या आणि परक्यांमध्ये फरक ओळखायला शिका, परिस्थिती ओरडून सांगतेय की एक व्हा" असं अकबरुद्दीन ओवैसी यांनी हैदराबादमधील एका कार्यक्रमात म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळालं. यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली वेगानं सुरू झाल्या आहेत.
भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष
भाजपनं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 74 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं पहिल्यांदाच जेडीयूपेक्षा जास्त जिंकल्या आहेत. त्यामुळे आता भाजप युतीमधील मोठा भाऊ ठरला आहे. जेडीयूला विधानसभा निवडणुकीत 43 जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही सरकारचं नेतृत्त्व नितीश कुमारच करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेतृत्त्वानं स्पष्ट केलं आहे.