पणजी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर एका हळदी समारंभात कोविडची सर्व मार्गदर्शन तत्वे धुडकावून भर गर्दीमध्ये नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
हळदी समारंभातील नृत्यामध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी तोंडावर मास्क परिधान केलेले नाही तसेच सोशल डिस्टेंसिंगचे नियम धुडकावून नृत्य चालू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. विरोधी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करताना एकीकडे रुग्णांना उपचारासाठी सरकारकडे खाटा नाहीत तसेच अन्य कोणत्याही सुविधा हे सरकार देऊ शकलेले नाही तर दुसरीकडे खुद्द उपमुख्यमंत्री पार्ट्यांमध्ये दंग आहेत. महामारीचे कोणतेही भान न ठेवता गर्दीत नृत्यामध्ये आजगावकर हे दंग आहेत, अशी टीका केली आहे.
सर्व काही मार्गदर्शक तत्त्वे पाळूनच
दरम्यान, उपमुख्यमंत्री आजगांवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझ्या पुतणीचे लग्न आज रविवारी आहे. त्यानिमित्त हळदी समारंभ काल शनिवारी होता त्यात केवळ आमचे कुटुंबीय सहभागी झाले होते. इतर कोणाला आम्ही बोलावले नव्हते. कुटुंबातील मोजक्याच सदस्यांबरोबर हळदी समारंभासाठी नृत्य करण्यात काही हरकत आहे, असे मला वाटत नाही. शिवाय आज लग्नसमारंभालाही आम्ही ७० पेक्षा अधिक लोकांना बोलावलेले नाही. कोविडची सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळूनच आम्ही हा विवाह समारंभ करीत आहोत. लोकांनीही मार्गदर्शक तत्वे पाळायला हवीत.'