मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं, ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी झाली असं दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण दिलं, मात्र २ तासांच्या बैठकीमुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यात निर्माण झालेली दरी कुठेतरी कमी होण्याची चिन्हे यानिमित्ताने दिसली, आगामी काळात शिवसेना-भाजपा एकत्र येतील अशीची चर्चा त्यामुळे राजकीय वर्तुळात सुरु झाली.
या मुलाखतीबाबत शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, संजय राऊतांनी पहिली मुलाखत माझी घेतली, त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलं, यानंतर मी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार, भाजपा नेत्यांची मुलाखत घेणार आहे, वृत्तपत्रांनी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांची मुलाखत त्यांच्या पत्रकारांनी किंवा संपादकांनी घेतली तर लगेच त्याची तडजोड पक्षासोबत होत नाही, त्यामुळे अधिक भाष्य करण्याची गरज नाही, मुलाखत घेतील, वृत्तपत्रात छापतील पण त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन्ही छत्रपतींनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवून घ्यावा
खासदारकीसाठी छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांची नियुक्ती भाजपाने केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणारच. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
काय म्हणाले संजय राऊत?
आमच्या भेटीवर कोणी नाराज असेल असं वाटत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मी गेल्या वर्षी भेटत होतो. त्यामुळेही काही जण नाराज होते. मात्र त्यातूनच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं, असं राऊत म्हणाले. विरोधी पक्षांमधील नेत्यांना भेटायचं नाही असा कायदा आहे का? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. दोन राजकीय नेते भेटतात, तेव्हा राजकीय चर्चा होतच असते. दोन डॉक्टर भेटतात तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातल्या घडामोडींवर चर्चा होते. साहित्यिक भेटतात, तेव्हा साहित्यावर गप्पा होतात. शास्त्रज्ञ भेटले की संशोधनांबद्दल बातचीत होते. तसंच राजकीय नेत्यांचंही आहे, अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीवर भाष्य केलं. राज्यातलं सरकार पाच वर्ष टिकणार आहे. त्यामुळे पुढील वर्षे विरोधकांना काही काम नाही, असा टोला राऊतांनी लगावला.
राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती
राज्याच्या राजकारणात वन फाईन मॉर्निंग अचानक ‘काहीतरी’ घडेल, असे भाकित भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले आहे. काही वेगळी राजकीय समीकरणे समोर येतील असे संकेतही त्यांनी दिले. आजच्या घडीला विधानसभेची मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे. त्यात केवळ पैसाच खर्च होतो असा नाही,आज कोरोनाचे संकट आहे. त्यात निवडणूक घेणे शक्य नाही. अशावेळी सध्याच्या सरकारला काहीतरी पर्याय नक्कीच उभा राहील. निवडणूक न होण्यासाठी सगळेच प्रयत्न करतील पण कोणतेच समीकरण जुळले नाही तर मग पर्याय नसेल असेही ते म्हणाले. भाजपा राज्यात यापुढील सर्व निवडणुका स्वबळावरच लढेल असं त्यांनी स्पष्ट केलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यातील भेटीत राजकीय विषयही होते पण त्यातून निष्पन्न काहीही झाले नाही. या भेटीमुळे राज्यात काही बदल होतील असे वाटत नसल्याचं पाटील म्हणाले.
संजय राऊतांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात..
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रविवारी सुमारे २ तास बैठक झाली, सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये ही बैठक झाली. त्यामुळे भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात होते, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा शिवसेनेसोबत युती करणार नाही, शिवसेनेसोबत हातमिळवण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट शब्दात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.