मुंबई - गोरगरीबांच्या एकवेळच्या भोजनाची सोय व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचा कारभार हाती घेताच शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लादण्यात आल्यानंतर राज्यात शिवभोजन (Shiva bhojan) थाळी मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार या योजनेचा लाभ लाखो लोकांना होत आहे. मात्र शिवभोजन घेण्यासाठी केंद्रावर गेलेल्या एका वृद्ध महिलेला केंद्रचालकाकडून मारहाण करण्यात आली, असा गंभीर आरोप भाजपाने केला आहे. (A woman who went to get Shiva bhojan was beaten by the center manager, Video shared by BJP)
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भातील एक ट्विट रिट्विट करून शेअर केले आहे. हा व्हिडीओ आशिष मेरखेड यांनी शेअर केलेला असून त्यामध्ये शिवभोजन केंद्रावर झालेल्या किरकोळ बाचाबाचीनंतर एका महिलेला हाकलून लावण्यात आल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ नांदेड बसस्थानकाजवळ असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या शिवभोजन केंद्रातील असल्याचा दावा आशिष मेरखेड यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकारावरून अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
प्रकारारावर प्रतिक्रिया देताना केलेल्या ट्विटमध्ये अतुल भातखळकर म्हणाले की, शिवभोजन घ्यायला गेलेल्या वृद्धेला मारहाण झाली आहे. हे असे मिळतेय गरिबांना 'शिवभोजन'. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन महाराष्ट्रात टक्केवारी सेनेची अशी वाटमारी सुरू आहे, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला.