Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते. विधानसभा अध्यक्षांचा माईक मोडला, त्यांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की, शिवीगाळ केली. कायदे, नियमात राहून १२ आमदारांचे निलंबन झाले आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली. (Shivsena Sanjay Raut Slams BJP over 12 Mla Suspension row)
सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु होता, वेगळ्यापद्धतीने. आमच्या कोकणात एक म्हण आहे, केला तुका, झाला माका. बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला. आमच्यावर टाकायला जात होते, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.
१२ आमदारांवर जी निलंबनाची कारवाई करण्यात आलीय ती शिस्त मोडण्यावर केलेल्या कारवाईचा भाग आहे. जर अशा गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर सभागृहात दंगली होतील. आपण पाकिस्तानात ते पाहिले आहे. दिल्लीतही पाहिलेले आहे. महाराष्ट्रात अशा परंपरा पडू नये असे वाटते, असे राऊत म्हणाले.
बेळगावच्या संदर्भात जर गोंधळ घालायचा असेल तर तो संसदेत वाव आहे, कालच्या घटनेवरून सांगतो, असा टोलाही राऊतांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला. बेळगावात जर काही होत असेल तर मी तिथे जाणार असल्याचा इशारा राऊत यांनी दिला.