Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसला पिपाणी चिन्हाचा काही मतदारसंघात फटका बसला. साताऱ्यात उमेदवार पराभूत झाला, तर बीडमध्येही मताधिक्य कमी झाले, असे दावे पक्षाकडून करण्यात आले. पिपाणी चिन्हाचा फटका विधानसभा निवडणुकीला बसू नये म्हणून आता प्रचार करतानाच खबरदारी घेतली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हाचा फटका बसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ते रद्द करण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. आयोगाने तुतारी चिन्हाचा आकार वाढवून देण्याची मागणी मान्य केली, पण पिपाणी चिन्हाची मागणी फेटाळली.
पिपाणी चिन्ह विधानसभा निवडणुकीत कायम राहणार असल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता प्रचार करतानाच काळजी घेतली जात आहे.
राष्ट्रवादीकडून तुतारीचा कसा केला जातोय प्रचार?
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी असाच उल्लेख केला जात होता. रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी प्रचार वाक्य पवारांच्या राष्ट्रवादीकडून वापरले जात होते.
लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्ह होते. त्याचाही ट्रम्पेट असाच उल्लेख केला गेल्याने राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) उमेदवारांना फटका बसला. आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून तुतारी या निवडणूक चिन्हाचा प्रचार करताना फक्त तुतारी असा करणे टाळले जात आहे. तर तुतारी वाजवणारा माणूस असा प्रचार केला जात आहे.
बॅनर, पोस्टर, पॅम्पलेट यावर पूर्वी निवडणूक चिन्ह तुतारी असा उल्लेख केला जात होता. त्यात आता बदल केला गेल्याचे दिसत आहे. आता तुतारी चिन्हाखाली तुतारी वाजवणारा माणूस असा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (महाविकास आघाडी) मतांची विभागणी मतांची विभागणी टाळण्यासाठी ही पद्धत प्रचार अवलंबल्याचे दिसत आहे.