"काल रात्री फोनवरून चर्चा झाली, आता..."; मविआचं काय ठरलं? वडेट्टीवारांनी गोंधळ संपवला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 02:57 PM2024-10-21T14:57:20+5:302024-10-21T15:00:32+5:30
Maha Vikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा ताणली गेली आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले. त्यावर विजय वडेट्टीवार बोलले आहेत.
Maha Vikas Aghadi Seat Sharing Latest Update: महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांनी काही जागांवर दावा केला असून, कुणीही माघार घेण्यास तयार नसल्याने जागावाटपाच तिढा वाढला. त्यातच काही वृत्तवाहिन्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या विचारात असल्याचे, संजय राऊतांनी अमित शाहांशी चर्चा केल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले. त्यावर आता विजय वडेट्टीवार बोलले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा किती सुटलाय? याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यासोबत बैठक झाली. त्यात काँग्रेस नेत्यांनी असे सांगितले की, शिवसेना दोन ठिकाणी बोलणं करतेय. अमित शाहांची भेट झाल्याची चर्चा आहे, असा मुद्दा माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केला. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "ही चर्चा अजिबात झालेली नाही. हे कुठेतरी भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. कारण राज्यात भारतीय जनता पक्ष घाबरलेला पक्ष आहे."
वडेट्टीवार म्हणाले, संजय राऊतांना जेलात कुणी घातलं?
संजय राऊत अमित शाहांमध्ये बोलणं झाल्याचेही वृत्त समोर आले. त्यावर ते म्हणाले, "मूळात अशी कुठलीही चर्चा झालेली नसताना, अहो आम्हाला माहितीये की संजय राऊतांना जेलात कुणी घातलं? त्यामुळे या बातम्यांत अजिबात तथ्य नाही. आणि आमच्या हायकमांडकडे कुठेही चर्चा झालेली नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीबरोबर आहेत. आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत", असे सांगत वडेट्टीवार यांनी गोंधळ दूर केला.
ते पुढे म्हणाले की, "जागावाटपाचा प्रश्न उद्या संध्याकाळपर्यंत सुटलेला दिसेल. आणि खरंतर ही बातमी आली कुठून? अशी कुठलीही चर्चा झाली नाही. आमची हायकमांडसोबत जागावाटपाबद्दल चर्चा झालीये. जिथे कुठे काही पेच होता, तो कसा सोडवायचा? याचं मार्गदर्शन आम्ही हायकमांडकडून घेत होतो, परंतू आता आलेली जी बातमी आहे. त्यामध्ये ०.१ टक्केही तथ्य नाही", असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
काही लोकांचं हे षडयंत्र आहे - वडेट्टीवार
"ही बातमी मुद्दाम पेरली गेली. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण व्हावा, हे षडयंत्र काही लोकांचं आहे. त्यामुळे यामध्ये यात काही सत्य नाही. आमची हायकमांडसोबत संजय राऊत अमित शाह यांना भेटले, याबद्दल चर्चा झाली नाही", असे वडेट्टीवार म्हणाले.
"आमची शिवसेनेनेसोबत (यूबीटी) सातत्याने चर्चा सुरू आहे. काल रात्रीपण झाली. त्यामुळे अनेक जागांवरील पेच कमी झाला आहे. आता सात-आठ जागांवरच पेच शिल्लक राहिलेला आहे. फोनवर चर्चा होऊ आम्ही पाच-सहा जागांचा तिढा काल रात्री सोडवला आहे", असेही त्यांनी स्पष्ट केले.