दार्जिलिंग : पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग मतदारसंघातील चोपरा गावात गुरुवारी मतदानाच्या दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पुन्हा शुक्रवारी दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामाऱ्या झाल्या. या वेळी जमावाने एकमेकांवर क्रूड बॉम्ब फेकले आणि हवेत गोळीबारही केला.या गोळीबारात एक शाळकरी मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, शीघ्र कृती दलाच्या तुकड्याही तिथे आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.चोपरा परिसरामध्ये गुरुवारी काही मतदारांना मतदान केंद्रामध्ये जाण्यापासून रोखण्यात आले होते. त्यानंतर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. तेव्हापासूनच येथे तणाव होता. शुक्रवारी पुन्हा दोन पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या वेळी गोळीबारही केला गेला. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही. निवडणूक आयोगाने गुरुवारी पश्चिम बंगालच्या तीन मतदारसंघांमध्ये झालेले मतदान किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडल्याचे सांगण्यात येते. दार्जिलिंग आणि रायगंज या मतदारसंघांमध्ये हिंसाचार झाला होता. (वृत्तसंस्था)
दार्जिलिंगच्या काही भागात पुन्हा हिंसाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 03:56 IST