लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी हे देशद्रोही नाहीत. प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेला हिंसाचार हे केंद्र सरकारचे कारस्थान होते, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपला कायमच पाठिंबा राहील, असेही केजरीवाल यांनी सांगितले. ते म्हणाले की, लाल किल्ल्यावरील हिंसाचार हा शेतकऱ्यांनी नव्हे तर केंद्र सरकारने घडविला आहे. आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीतील रस्त्यांची नीट माहितीही नाही. ते हिंसाचार घडवतीलच कसे, असा सवालही केजरीवाल यांनी विचारला.
मेरठ येथे रविवारी झालेल्या किसान महापंचायतीमध्ये अरविंद केजरीवाल म्हणाले की, प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये नेमके काय झाले याची दिल्लीचा मुख्यमंत्री असल्याने मला संपूर्ण माहिती आहे. देशातील शेतकरी सध्या खूप दु:खी आहे. आपल्या मागण्यांसाठी हे शेतकरी गेल्या ९० दिवसांहून अधिक काळ आंदोलन करत आहेत. त्यात २५० शेतकऱ्यांचे बळी गेले. इतके होऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्राने काहीही केले नाही.