ठाणे : ठाण्यातील भाजपचे वादग्रस्त आणि चर्चेत असलेले नगरसेवक विलास कांबळे यांच्या नव्या व्हिडीओमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नाकीनऊ आले आहेत. डान्स बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत डान्स करतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली असून, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजन विचारे यांचा प्रचार करण्याऐवजी कार्यकर्त्यांना कांबळे यांच्या या कथित व्हायरल व्हिडीओसंदर्भातच उत्तरे द्यावीलागत आहेत. यामुळे कांबळे यांच्याबाबत पक्ष काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे.उमेदवार सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचारासाठी जिवाचे रान करताना दिसत आहे. शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार राजन विचारे हे युतीचे उमेदवार असून, त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. परंतु, त्यांच्याच पक्षातील नगरसेवकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, भाजपची मंडळी अडचणीत आली आहेत. राजकीय वर्तुळात या व्हिडीओविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या संदर्भात विलास कांबळे यांच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधूनही आणि मेसेज पाठवूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
नगरसेवकाच्या व्हायरल क्लिपमुळे ठाण्यात भाजपच्या आले नाकीनऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 6:18 AM