नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक 2019 पुन्हा सत्तेत परतण्यासाठी भाजपानं जोरदार प्रयत्न चालवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शाहसह अनेक दिग्गज नेते भाजपाच्या प्रचारात व्यस्त आहेत. याच दरम्यान भाजपाकडून स्टार प्रचारकांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत असंही एक नाव आहे की, जे सध्या चर्चेत आहे.हे नाव दुसरं, तिसरं कोणाचं नव्हे, तर चित्रपट अभिनेते विवेक ओबेरॉय याचं आहे. अभिनेते विवेक ओबेरॉयला भाजपानं गुजरातच्या स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिलं आहे. दुसरीकडे अभिनेते विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करत आहेत. त्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट निवडणुकीदरम्यान प्रदर्शित होणार असल्यानं त्यावर आक्षेप नोंदवला गेला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे काही पोस्टर्सही समोर आले होते, ज्यात विवेक ओबेरॉय वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळाला. मोदींच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपटात त्यांची भूमिका साकारणाऱ्या विवेक ओबेरॉयचं नाव गुजरातच्या सत्ताधारी भाजपानं 40 स्टार प्रचारकांच्या यादीत टाकलं आहे. या यादीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसह अभिनेते परेश रावल आणि हेमा मालिनींच्या नावाचाही समावेश आहे. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची या निवडणुकी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
...अन् बॉलिवूडचा स्टार विवेक ओबेरॉय झाला भाजपाचा 'स्टार' प्रचारक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 7:25 PM