नवी दिल्ली- केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांनाच घरचा अहेर दिला आहे. व्ही. के. सिंह म्हणाले, भारताचं लष्कर हे कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही, जे लोक असा दावा करत असतील ते देशद्रोही आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी भारतीय लष्कराला मोदींची सेना असं म्हटलं होतं. आदित्यनाथांनी 1 एप्रिलला गाझियाबादमध्ये एका रॅलीला संबोधित करताना हे वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आता व्ही. के. सिंग यांनीही त्यांना घरचा आहेर दिला आहे. व्ही. के. सिंहांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहेत की, यासंदर्भात मला काहीही माहिती नव्हती. भारताचं लष्कर हे देशाचं आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही. जर कोणी असं म्हणत असेल की भारताची सेना मोदींची सेना आहे, तर तो चुकीचं म्हणत आहे. खरं तर ती व्यक्ती देशद्रोही आहे.
तर दुसरीकडे भारतीय लष्कराला मोदी की सेना म्हणणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. यातून त्यांनी सैन्याच्या दुरुपयोगाबद्दल चिंता बोलून दाखवली होती. निवडणूक प्रचारातील सैन्याचा दुरुपयोग रोखावा, अशी मागणी त्यांनी केली होती. आपल्या भूमिकेला सैन्य दलातील अनेक अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचंदेखील रामदास यांनी पत्रात नमूद केलं होतं. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सोमवारी एका जनसभेला संबोधित करताना भारतीय सैन्याचा उल्लेख 'मोदी की सेना' असा केला होता. याची दखल घेत निवडणूक आयोगानं अहवाल मागवला आहे.
रामदास यांनी त्यांच्या पत्रात जैश-ए-मोहम्मदच्या विरोधात करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकवरून सुरू असलेल्या राजकारणाबद्दल चिंता व्यक्त केली होती. यामुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये करण्यात आलेले हवाई हल्ले आणि त्यानंतर हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुरक्षित घरवापसीवरून सुरू असलेल्या राजकारणाकडे रामदास यांनी निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलं होतं.