West Bengal Election: पश्चिम बंगालमध्ये अखेरच्या टप्प्यातील मतदान; बीरभूममध्ये तृणमूलचा 'बाहुबली' अनुब्रत मंडल नजरकैदेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 08:09 AM2021-04-29T08:09:58+5:302021-04-29T08:15:02+5:30
Bengal Vidhansabha Election : अनुब्रत मंडल हे बीरभूम जिल्ह्याचे तृणमूलचे अध्यक्ष आहेत. धक्कादायक म्हणजे नजरकैदेत असूनही मंडल हे सुरक्षा दलाच्या जवानांच्या डोळ्यात धूळ फेकत काही तास गायब झाल्याने खळबळ उडाली होती.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धुरळा उडाला आहे. आज आठव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान होत आहे. मतदान सुरु होण्याच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचा बाहुबली नेते अनुब्रत मंडल (TMC Leader Anubrat Mondal) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांना मंगळवार सायंकाळी ५ वाजल्यापासून मतदान संपल्यानंतरचा दुसरा दिवस शुक्रवारच्या सायंकाळी ७ वाजेपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे केंद्रीय सुरक्षा दलांचे जवान व एक मॅजिस्ट्रेट डोळ्यात तेल घालून अनुब्रत मंडलवर (Anubrat Mondal News) लक्ष ठेवून आहेत. (EC puts TMC's Anubrata Mondal under ‘strict surveillance’ as Bengal nears last phase of polls.)
अनुब्रत मंडल हे बीरभूम जिल्ह्याचे तृणमूलचे अध्यक्ष आहेत. धक्कादायक म्हणजे नजरकैदेत असूनही मंडल हे सुरक्षा दलाच्या जवानांच्या डोळ्यात धूळ फेकत काही तास गायब झाल्याने खळबळ उडाली होती. पश्चिम बंगालमध्ये आज शेवटच्या आठव्या टप्प्यातील ३५ जागांवर मतदान सुरु झाले आहे.
Voting for the eighth and final phase of #WestBengalElections2021 begins; 35 seats in the fray. pic.twitter.com/9scoGNcLrT
— ANI (@ANI) April 29, 2021
पश्चिम बंगालमध्ये आज होणाऱ्या मतदानात बीरभम जिल्ह्यातील ११ जागा येतात. यापैकी १० जागांची जबाबदारी आपण घेतो, दुबराजपूरची नाही, असे अनुब्रत यांनी ममता बॅनर्जींना सांगितले होते. यानंतर ममता यांनी ११ वी जागा म्हणजेच दुबराजपूरचा उमेदवारच बदलला होता. यावरून या जिल्ह्यात अनुब्रत यांचा किती दरारा आहे हे दिसून येते. २०१९ च्या लोकसभा आणि २०१६च्या विदानसभा निवडणुकीवेळीदेखील निवडणूक आयोगाने नजरकैदेत ठेवले होते. (Anubrata Mondal holds considerable sway over the district of Birbhum.)
आठव्या टप्प्यातील मतदानासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या ६४१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत यापैकी २२४ तुकड्या या एकट्या बीरभूम जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत. आज होणारे मतदान मुर्शिदाबाद ११, बीरभूम ११, मालदा ६ आणि कोलकाता ७ अशा जागांवर होत आहे.