देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धुरळा उडाला आहे. आज आठव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान होत आहे. मतदान सुरु होण्याच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचा बाहुबली नेते अनुब्रत मंडल (TMC Leader Anubrat Mondal) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांना मंगळवार सायंकाळी ५ वाजल्यापासून मतदान संपल्यानंतरचा दुसरा दिवस शुक्रवारच्या सायंकाळी ७ वाजेपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे केंद्रीय सुरक्षा दलांचे जवान व एक मॅजिस्ट्रेट डोळ्यात तेल घालून अनुब्रत मंडलवर (Anubrat Mondal News) लक्ष ठेवून आहेत. (EC puts TMC's Anubrata Mondal under ‘strict surveillance’ as Bengal nears last phase of polls.)
अनुब्रत मंडल हे बीरभूम जिल्ह्याचे तृणमूलचे अध्यक्ष आहेत. धक्कादायक म्हणजे नजरकैदेत असूनही मंडल हे सुरक्षा दलाच्या जवानांच्या डोळ्यात धूळ फेकत काही तास गायब झाल्याने खळबळ उडाली होती. पश्चिम बंगालमध्ये आज शेवटच्या आठव्या टप्प्यातील ३५ जागांवर मतदान सुरु झाले आहे.
आठव्या टप्प्यातील मतदानासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या ६४१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत यापैकी २२४ तुकड्या या एकट्या बीरभूम जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत. आज होणारे मतदान मुर्शिदाबाद ११, बीरभूम ११, मालदा ६ आणि कोलकाता ७ अशा जागांवर होत आहे.