देहरादून: अगस्ता वेस्टलँड घोटाळ्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा थेट गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. अगस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीत 'AP' आणि 'FAM' यांना लाच देण्यात आली, अशी घणाघाती टीका मोदींनी केली. यावेळी त्यांनी अगस्ता प्रकरणातील मध्यस्थ ख्रिश्चियन मिशेलचा संदर्भ देत काँग्रेसवर शरसंधान साधलं. ते उत्तराखंडमध्ये जनसभेला संबोधित करत होते. चौकीदारानं हेलिकॉप्टर घोटाळ्यातील काही दलालांना दुबईहून भारतात आणलं. यानंतर इटलीच्या मिशेल मामा आणि इतर मध्यस्थांची चौकशी झाली, असं मोदी म्हणाले. 'या प्रकरणाच्या आरोपपत्रात एपी आणि फॅम असा असा उल्लेख आहे. यातील एपीचा अर्थ अहमद पटेल आणि फॅमचा अर्थ फॅमिली असा होतो. आता अहमद पटेल कोणत्या फॅमिलीचे निकटवर्तीय आहेत, हे तुम्हीच मला सांगा,' असं म्हणत मोदींनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. 'ज्या कुटुंबाची विमानतळावर कोणीही चौकशी करत नव्हतं, ज्यांना सर्वजण सलाम करायचे, ते आज जामीनावर आहेत. जे स्वत:ला देशाचे भाग्यविधाते समजत होते, ते आज तुरुंगवारी टाळण्याचे प्रयत्न करत आहेत,' अशा शब्दांमध्ये मोदींनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही तोंडसुख घेतलं. 'काँग्रेसचा जाहीरनामा पाहिल्यास त्यांचा हात कोणासोबत आहे ते समजेल. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी, फुटिरतावादी कारवाया करणाऱ्यांविरोधात कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा दलांना विशेषाधिकार देण्यात आले आहेत. काँग्रेस या विशेषाधिकारांच्या विरोधात आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास सुरक्षा दलांना देण्यात आलेला विशेषाधिकार काढून घेण्यात येईल. त्यामुळे त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल,' असं मोदी म्हणाले.