मुंबई : पश्चिम बंगालमध्ये भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून सोमवारी चर्चा केली. केंद्र सरकारच्या मदतीने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे. कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्र सरकार हस्तक्षेप करत अधिकारी बदलले जात आहेत. यावर ममता आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. प. बंगालमध्ये येत्या मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून, भाजपने त्यासाठी जोरदार तयारी केली आहे. दुसरीकडे विरोधकांची एकजूट नसल्याने तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, काँग्रेस, एमआयएम आदी पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या फाटाफुटीचा भाजपला फायदा मिळू नये, यासाठी सर्वांना एकत्र आणण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये झालेल्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
प. बंगालमध्ये नवीन राजकीय समीकरणे ?, शरद पवारांची ममता बॅनर्जींशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 5:15 AM