मुंबई : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप यावर तोडगा निघाला नसल्यामुळे शेतकरी संघटनांकडून आक्रमक भूमिका घेत शनिवारी देशभर चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
या चक्का जाम आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या शेतकरी आंदोलनाबद्दल भाजपाच्या नेत्यांकडून खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही असल्याचा आरोप केला जात आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपालाकंगना राणौतला पाठिंबा दिल्याचे स्मरण करून देत खडेबोल सुनावले आहेत.
सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वोतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलिसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?,” असा सवाल सचिन सावंत यांनी भाजपाला केला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली. मात्र, अद्याप तोडगा निघाला नसून शेतकरी नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी ठाम आहे.
तर शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी संघटनांचा पाठिंबा असल्याचा आरोप भाजपाच्या काही नेत्यांकडून करण्यात आला होता. तसेच, अभिनेत्री कंगना राणौत हिनेही आंदोलनाला खलिस्तानी संघटनांचा समावेश असल्याचे म्हटले होते. याशिवाय, गेल्या काही दिवसांपूर्वी कंगना राणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर म्हणून केली होती आणि मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपाला सुनावले आहे.