कोलकाता : पश्चिम बंगालमधील भवानीपूर या परंपरागत विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप उमेदवारावर ५८ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविला. तर जंगीपूर व समशेरगंज या दोन मतदारसंघांतही तृणमूलचेच उमेदवार विजयी झाले.
विधानसभा निवडणुकांत ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राम मतदारसंघात पराभव झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्रीपद कायम राखण्यासाठी त्यांना सहा महिन्यांच्या आत पुन्हा विधानसभेवर निवडून येणे आवश्यक होते. भवानीपूरमधील लढतीत ममता बॅनर्जी यांना ८५,२६३ तर भाजपच्या उमेदवार प्रियांका टिब्रेवाल यांना २८,४२८ मते मिळाली, तर तिसऱ्या क्रमांकावरील माकपचे उमेदवार श्रीजिब विश्वास यांनी ४,२२६ मते मिळाली आहेत. पश्चिम बंगालमधील जंगीपूरमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार झाकीर हुसैन यांनी ९२ हजार मतांची तर त्याच पक्षाचे अमिरुल इस्लाम यांनी समशेरगंजमध्ये २६,१०० मतांची आघाडी घेऊन विजय मिळविला आहे.
आपल्या विजयानंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, नंदिग्राममध्ये माझा पराभव करण्याचे जे कारस्थान रचण्यात आले, त्याला भवानीपूरच्या मतदारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. नंदिग्रामचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी त्यावर फार बोलणार नाही. भवानीपूरमधील ४७ टक्के लोक बंगाली नाहीत, तरीही त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विजयी केले, हे अतिशय महत्त्वाचे आहे.
बीजेडी उमेदवाराचा विजयओडिशा येथील पिपली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बिजू जनता दलाचे (बीजेडी) उमेदवार रुद्रप्रताप महारथी यांचा विजय झाला आहे. त्यांना भाजपचे उमेदवार अश्रित पटनायक यांच्यापेक्षा २० हजार मते अधिक मिळाली. रुद्रप्रताप महारथी यांना ९६,९७२ व पटनायक यांना ७६,०५६ तर काँग्रेस उमेदवार हरिचंदन मोहपात्रा यांना ४,२६१ मते मिळाली.