मुंबईमुंबईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडामध्ये १ हजार हेक्टरवर नवी फिल्मसिटी उभारणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. मुंबई आज पत्रकार परिषद घेऊन आदित्यनाथ यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
"बॉलिवूडची फिल्मसिटी घेऊन जाण्याचा काही प्रश्नच नाही. फिल्मसिटी ही खुली प्रतिस्पर्धा आहे. प्रत्येक राज्याला प्रगती करण्याचा हक्क आहे. आम्ही जागतिक सुविधा देणारी नवी फिल्मसिटी उभारणार आहोत. त्यामुळे इतरांनी चिंता करण्याचं कारण नाही", असा टोला योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेला लगावला आहे.
उत्तर प्रदेशात गुंतवणूक करणाऱ्यांशी गेल्या दोन दिवसांत चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं. गुंतवणूकदार उत्तर प्रदेशात आणखी गुंतवणूक करण्यास इच्छुक असून जागतिक दर्जाच्या सुखसोयी देणाऱ्या फिल्मसिटीच्या निर्मितीसाठी अनेकांशी चर्चा झाल्याचं आदित्यनाथ म्हणाले. कोरोना काळात देखील उत्तर प्रदेशात गुंतवणुकीत चांगली वाढ झाली आहे. यासोबतच कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे उत्तर प्रदेशात उद्योगांना चालना मिळेल, असंही ते पुढे म्हणाले.
नोएडात १ हजार हेक्टरवर उभी राहणार फिल्मसिटीउत्तर प्रदेशचे कॉर्पोरेट हब म्हणून ओळख मिळवलेल्या नोएडामध्ये नवी फिल्मसिटी उभारण्यात येणार आहे. यासाठी १ हजार हेक्टर इतकी जागा निश्चित करण्यात आल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. नवी फिल्मसिटी आग्रा, मथुरा आणि दिल्लीहून प्रवासासाठी सोयीस्कर ठरेल असं सांगतानाच या फिल्मसिटीत आम्ही जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आदित्यनाथ म्हणाले.
कायदा-सुव्यवस्था सुधारल्याने राज्य प्रगतीपथावरउत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे सामाजिक सुरक्षेत चांगली वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील उद्योगधंदे देखील वाढत आहेत, असा दावा योगींनी यावेळी केला. कोरोना काळात देखील युवांना १ कोटी रोगजार देणारं उत्तर प्रदेश हे देशातील पहिलं राज्य असल्याचंही ते म्हणाले.