नवी दिल्ली: उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज (रविवार, 18 जुलै) सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक (All Party Meeting) बोलावण्यात आली होती. यात नरेंद्र मोदींनी विरोधकांचे मत आणि त्यांचा सल्ला महत्वाचा असल्याचे म्हटले. तसेच, वादविवाद महत्त्वाचा असून एक अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी, असेही मत व्यक्त केले.
बैठकीत पंतप्रधान(PM Modi) म्हणाले की, आम्ही प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्यास तयार आहोत. विरोधकांचे मत आणि त्यांचा सल्ला महत्वाचा आहे. वादविवाद होऊन अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी, असे मत मोदींनी व्यक्त केले. बैठकीत 33 पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह एकूण 40 पेक्षा जास्त नेते सामील होते. अनेक नेत्यांनी महत्वाच्या मुद्यांवर आपले सल्लेही दिले, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री प्रह्लाद जोशींनी दिली.
बैठकीत अनेक नेत्यांचा सहभाग
या बैठकीत पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सरकारने विरोधी पक्षांकडून सहकार्याची मागणी केली. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रह्लाद जोशींनी सर्व पक्षांना आमंत्रित केले होते. बैठकीसाठी आतापर्यंत राजनाथ सिंह, पीयूष गोयल, प्रह्लाद जोशी, मल्लिकार्जुन खड़गे, अधीर रंजन चौधरी, आनंद शर्मा, संजय राउत, पशुपती पारस, अनुप्रिया पटेल, रामगोपाल यादव, त्रुची शिवा, टीआर बालू, हरसिमरत कौर बादल, डेरेक ओ ब्रायन, सुदीप बंधोपाध्याय, संजय सिंह दाखल झाले आहेत.
उद्यापासून अधिवेशनाला सुरुवातसोमवारपासन सुरू होणारे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यादरम्यान, विरोधक महागाई, तेलाच्या वाढत्या किमती, कोरोना लसींचा अभाव, शेतकरी आंदोलन, राफेल करार, भ्रष्टाचार आणि राष्ट्रीय सुरक्षा मुद्दय़ांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. त्याचबरोबर या अधिवेशनात तीन अध्यादेशांसह एकूण 23 विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्यापैकी 17 नवीन विधेयकं आहेत.