कोप्पलः लोकसभा निवडणुकीचा देशभर प्रचार सुरू आहे. याच दरम्यान कर्नाटकातील एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानं मुस्लिमांसंदर्भात एक विधान केलं आहे. कर्नाटक भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांनी एका रॅलीदरम्यान मुस्लिमांवर विश्वास नसल्याचं सांगितलं आहे. ईश्वरप्पांनी हे विधान कोप्पलमधअये कुरबा आणि अल्पसंख्याक समुदायाला संबोधित करताना केलं आहे. ते म्हणाले, काँग्रेसनं तुमचा फक्त वोट बँक म्हणून वापर केला आहे.तसेच तुम्हाला तिकीटसुद्धा दिलं नाही. आम्ही मुस्लिमांना तिकीट देत नाही. कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नाही. आमच्यावर विश्वास ठेवा मगच आम्ही तुम्हाला तिकीट आणि इतर गोष्टी देऊ. केएस ईश्वरप्पा हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. कर्नाटकातील जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारमध्ये 2012 ते 2013दरम्यान ते उपमुख्यमंत्री राहिले होते. कर्नाटकातील 14 लोकसभा जागांसाठी 18 एप्रिलला आणि इतर 14 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. 70 वर्षी ईश्वरप्पा हे कुरुबा समुदायाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधानं केली आहेत.
मुस्लिमांवर आमचा विश्वास नाही, म्हणून त्यांना तिकीट नाही, भाजपाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 3:32 PM