नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांवर पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे. काँग्रेस सोडणारे नेते RSS ची माणसं आहेत. काँग्रेसला निडर नेत्यांची गरज आहे. कमजोर नेत्यांची नाही. संघाच्या विचारधारेवर विश्वास ठेवतील अशी माणसं काँग्रेसला नको. अशा नेत्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवायला हवा अशा कडक शब्दात राहुल गांधींनी सुनावलं आहे. पक्षाच्या सोशल मीडिया यूनिटच्या बैठकीत ते बोलत होते.
काँग्रेसला निडर लोकांची गरज, डरपोकांनी बाहेर जावं
खासदार राहुल गांधी म्हणाले की, देशात खूप असे नेते आहेत जे निडर आहेत, पण काँग्रेसमध्ये नाहीत. या नेत्यांना पक्षात आणलं पाहिजे. जे भाजपाला घाबरतात अशा काँग्रेसी नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे. आम्हाला अशा नेत्यांची गरज नाही. जे आरएसएसच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात. आम्हाला निडर लोकांची गरज आहे असं त्यांनी सांगितले.
खूप सारे लोक आहेत जे घाबरत नाहीत. त्या सगळ्यांना काँग्रेसमध्ये आणावं. जे आमच्याकडे घाबरतात त्यांनी बाहेर पडावं. तुमची गरज नाही, RSS मध्ये जा, आम्हाला निडर लोकांची गरज आहे. ही आमची आयडियोलॉजी आहे असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या या विधानामागे ज्योतिरादित्य शिंदे आणि जितीन प्रसादसारखे नेते होते जे अलीकडेच भाजपात सहभागी झाले आहेत. काँग्रेसमध्ये राहून ज्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे अशांना राहुल गांधींनी स्पष्ट इशाराच दिला आहे. पक्षाच्या नेतृत्वाबद्दल काँग्रेसमध्ये जी २३ नेत्यांचा गट बनला होता त्यांच्यावरही राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
प्रशांत किशोर यांनी घेतली होती भेट
२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला तोडीसतोड आव्हान देण्यासाठी आणि देशातील प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसची मोर्चेबांधणी करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांची भेट २०१७ साली उत्तर प्रदेश निवडणुकीवेळी झाली होती. पण त्यावेळी किशोर यांच्या रणनितीला यश आलं नव्हतं. काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.