नवी दिल्ली: देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज असल्यानं त्यांना निवडून देण्याचं आवाहन देशातील 900 पेक्षा अधिक कलाकारांनी केलं आहे. यामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय, गायक शंकर महादेवन, गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह अनेक प्रख्यात कलाकारांचा समावेश आहे. या सर्व कलाकारांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत देशाला मजबूर नव्हे, तर मजबूत सरकार आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचं आवाहन या कलाकारांनी केलं आहे. 'पंतप्रधान म्हणून देशाला नरेंद्र मोदींची आवश्यकता आहे. ही काळाची गरज आहे. दहशतवादासारखी आव्हानं देशासमोर असताना 'मजबूर' नव्हे, तर 'मजबूत' सरकारची गरज आहे. त्यामुळेच आताचं सरकारच सत्तेत राहायला हवं,' असं 900 हून जास्त कलाकारांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. यामध्ये त्रिलोकी नाथ मिश्रा, कोयना मित्रा, हंस राज हंस यांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये देशानं भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि विकासाभिमुख प्रशासन पाहिलं आहे, अशा शब्दांमध्ये कलाकारांनी त्यांच्या निवेदनात मोदी सरकारचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे आठवड्याभरापूर्वीच 600 हून अधिक कलाकारांनी भाजपा आणि मित्र पक्षांविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये अमोल पालेकर, नसिरीद्दुन शहा, गिरीश कर्नाड यांचा समावेश होतो. भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांना सत्तेतून खाली खेचण्याचं आवाहन या मंडळींनी केलं होतं. मोदी कायम सत्तेत राहिल्यास संविधानाला धोका असल्याची भीती या कलाकारांनी व्यक्त केली होती. गेल्या गुरुवारी 12 भाषांमध्ये हे संयुक्त निवेदन प्रसिद्ध आर्टिस्ट युनाईट इंडियाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं. आगामी लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं होतं.
मोदींना साथ द्या; 900 हून अधिक कलाकार भाजपासाठी सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 5:21 PM