मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीचा तिसरा भाग आज प्रसिद्ध झाला. यात पवारांनी २०१४ मध्ये भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. जाणीवपूर्वक आम्ही भाजपाला पाठिंबा दिल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा उलगडा केला आहे.
याबाबत शरद पवार म्हणाले की, शिवसेनेने भाजपाबरोबर जाऊ नये अशी माझी पहिल्यापासून मनात इच्छा होती, ते जातील असे दिसले त्यावेळी मी जाणीवपूर्वक स्टेंटमेंट केले, आम्ही तुम्हाला(भाजपाला) बाहेरुन पाठिंबा देतो, त्यात शिवसेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी हा हेतू होता, पण तसं घडलं नाही, त्यांनी सरकार बनवलं, भाजपाच्या हातात सरकार चालवू देणं हे शिवसेनेच्या हिताचं नाही. कारण दिल्लीची सत्ता त्यांच्या हातात, राज्याची सत्ता म्हणजे मुख्यमंत्री त्यांच्या हातात. यामुळे शिवसेना आणि अन्य पक्षांना लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार आहे हेच त्यांना मान्य नाही, त्यामुळे भाजपा आज ना उद्या या सर्वांना निश्चितपणे धोका देणार आहेत म्हणून ही राजकीय चाल होती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. (Sharad Pawar Interview With Sanjay Raut)
त्याचसोबत २०१९ च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेला बरोबर घ्यायचं नाही, तुम्ही त्यात येऊन स्थिर सरकार बनवायला आम्हाला साथ द्या असं भाजपाचे काही नेते आमच्या लोकांशी बोलत होते, आमच्यातल्या काही सहकाऱ्यांशी, माझ्याशीही एकदा-दोनदा बोलले, ते बोललेच, त्यांच्यामते माझे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) चांगले संबंध आहेत, त्यामुळे पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी असा निरोपही माझ्या कानावर आल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
दरम्यान, ऑपरेशन कमळ याचा अर्थ सरळ सरळ सत्तेचा गैरवापर करुन लोकांनी निर्माण केलेली सरकारं दुबळी करणे, डिस्टॅबिलाईज करणं आणि त्यांच्यासाठी केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणे हा आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा तीन महिन्यात ऑपरेशन कमळ होईल सांगत होते, त्यानंतर सहा महिने झाले, आता सप्टेंबरचा वायदा आहे, काही लोक ऑक्टोबर करतायेत. पण हे सरकार ५ वर्ष उत्तमरितीने राज्याचा कारभार करेल आणि ऑपरेशन कमळ असो की अन्य काही त्याचा काहीही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होणार नाही असा विश्वास शरद पवारांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे. (Sharad Pawar Interview With Sanjay Raut)
डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये फडणवीसांचं स्थान काय होतं?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीसंदर्भात गौप्यस्फोट केले होते त्यात २०१४ मध्ये राष्ट्रवादीला भाजपासोबत सरकार बनवायचं होतं. त्यानंतर पुन्हा मधल्या काळात भाजपाचे वरिष्ठ नेते आणि तुम्ही सरकार बनवण्यासंदर्भात चर्चा करत होते असं म्हटलं होतं. त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलं की, ते माझ्याही वाचनात आलं. पण गमंत अशी आहे की, त्यावेळी हे कुठे होते मला माहित नाही. डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये यांचे काय स्थान होतं? हे मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना माहित झाले, त्याच्याआधी विरोधी पक्षातला जागरुक आमदार म्हणून त्यांचा लौकीक होता. पण संबंध राज्याच्या किंवा देशाच्या नेतृत्वात बसून निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता असं मला कधी जाणवलं नाही. ते म्हणतात त्याप्रमाणे त्या काळात शिवसेना आणि भाजपाचे सरकार बनू नये यासाठी एकदा मी कॉन्शिअसली स्टेटमेंट केले होते.
पाहा व्हिडीओ