मुंबई : दसरा मेळावा हा राजकीयच असतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय उद्देशानेच हा मेळावा सुरु केला होता. या मेळाव्यात दिशा दिली जाते. आम्ही चिटिंग केल्याचे आरोप भाजपावाले करतात, आम्ही का चिटिंग करू? तुम्ही केला आम्ही ती उधळून लावतो, आम्ही मुद्द्यांचा नाही गुद्द्यांचा विचार करतो, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधेमधे मास्क काढतात. राज्यपालांना दिलेले उत्तर हे राजकीय होते. देशभरात हे पत्र गाजले, खळबळ उडाली. शिवसेनेला, महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जनतेला ठोशास ठोसा हवा आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा एक प्रोटोकॉल असतो, ते महाराष्ट्राच्या मनातील बोलतील असा मला विश्वास आहे, असे राऊत यांनी सांगितले. टीव्ही 9 वर त्यांची मुलाखत घेण्यात आली.
आज तीन दसरा मेळावे झालेले असले तरीही देशभरात दोन मेळावे चर्चिले जातात. नागपूरचा स्वयंसेवक संघाचा मेळावा आणि गेल्या 55 वर्षांपासून शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा. या दोन संघटनांचा लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होतो, असे राऊत म्हणाले. खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला हे दो दिल मिल गये, हम क्या करे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शरद पवार यांना जर त्यांच्या पक्षाची ताकद त्या भागात वाढवायची असेल त्या उद्देशाने त्यांनी खडसेंना प्रवेश दिला. पंकजा मुंडे शिवसेनेत येऊ शकतात यावर मी भाष्य करणार नसल्याचेही राऊत यांनी सांगितले.
मोदींच्या सभेला होणाऱ्या गर्दीचं काय?
आम्हाला जनाची, मनाची आहे म्हणूनच शिवतीर्थावर होणारा भव्य मेळावा सावरकर सभागृहात घेत आहोत. पण निवडणूक जिंकण्यासाठी हजारोंची गर्दी असलेल्या सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये घेत आहेत. शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यावर टीका करत असाल, तर मोदींच्या सभांचं काय? तिथे जनाची, मनाची, तनाची, धनाची बाळगली जात नाही, अशा तिखट शब्दांत राऊत यांनी भाजप नेत्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
फडणवीसांच्या प्रकृतीसाठी जगदंबेचरणी प्रार्थना
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्यानं दौरे करत आहोत. त्यांना काळजी घेण्याचा सल्ला आम्ही दिला होता. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. परिस्थिती किती गंभीर आहे हे आता त्यांना समजलं आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी आम्ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. शासकीय रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आहे. त्यांची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत, असं राऊत यांनी सांगितलं.