पुणे : आम्ही लोकसभेसाठी भाजपाबरोबर होतो. आम्ही जागा मागितली नव्हती, आमचा उमेदवारही नव्हता, मात्र आम्ही भाजपासाठी काम केले. आता विधानसभेसाठी मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य असेल. त्यांनी मित्रपक्षांना जागा देणार असे सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या जागेवर आमचे उमेदवार कमळ चिन्हावरच निवडणूक लढतील. रयत क्रांती ही शेतकरी संघटना आहे, कोणता राजकीय पक्ष नाही, त्यामुळेच असा निर्णय घेतला आहे, असे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
खरीप हंगामाची पुणे विभागाची माहिती घेण्यासाठी खोत सोमवारी विधानभवनात आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.खोत म्हणाले, ६ जूनला गंगाधाम येथे रयत क्रांतीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यात लोकसभा निवडणूक, त्यातील कामगिरी, शेतकऱ्यांची स्थिती, त्यावरचे उपाय अशा महत्वाच्या विषयांबरोबरच विधानसभेसाठी घ्यायची भूमिका यावरही मंथन होईल. त्यानंतर त्याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना कळवली जाईल व त्यात जागांची मागणी केली जाईल.
मागील वेळी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याआधी खरीप हंगामाबाबत विभागीय बैठका झाल्या होत्या. यावेळी निवडणूक आचारसंहितेमुळे ते शक्य झाले नाही. आता मुख्यमंत्र्यांनी थेट राज्याचीच बैठक ७ जूनला मुंबईत आयोजित केली आहे. त्यात शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत चर्चा होऊन योजना तयार करण्यात येईल, असेही खोत यांनी सांगितले.