सोलापूर – अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत, पुढील २-३ दिवसांत माहिती गोळा करण्याचं काम होईल, त्यानंतर सरकारकडून जे शक्य आहे ते करणार आहे, घोषणा देणारे गेले आम्ही प्रत्यक्षात काम करू असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे. विदर्भ पूर, निसर्ग चक्रीवादळ येथेही मदत केली आहे, परतीच्या पावसाचं संकट टळलं नाही, आणखी काही दिवस अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे नुकसान किती होतेय याचा अंदाज आला आहे, सरकार लवकरच मदत करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.
पाहणी दौरा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पावसाळा सुरुवात झाल्यापासून मी सातत्याने संपर्कात आहे, नुकसान किती होतेय, पावसाचा अंदाज याची माहिती घेत होतो, टार्गेट दिल्यासारखं पाऊस सगळीकडे पडतोय. ७२ वर्षात असा पाऊस पाहिला नाही असं एका वयोवृद्ध शेतकऱ्याने सांगितलं आहे. शेतकरी आणि आपत्तीग्रस्त हे संकटाच्या डोंगराखाली अडकलेले आहेत, त्या लोकांना दिलासा आणि धीर देण्यासाठी आम्ही इथं आलोय, सरकारकडून जे जे काही करणे आवश्यक आहे ते लोकांसाठी आम्ही करू, हे सरकार तुमचं आहे, परतीचा पाऊस आणखी किती दिवस चालेल, त्याचा फटका कितपत बसेल याचा अंदाज आला आहे. दुर्दैवाने ज्यांच्या घरातील माणसं दगावली त्यांना काही दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. सावध राहा, प्राणहानी होऊ नये अशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच केंद्राकडे मदत मागण्यास गैर काय? पंतप्रधानांनी फोन करून सांगितलं आहे, चिंता करू नये, आवश्यक मदत करणार असं आश्वासन दिलं आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज पाणी आहे, त्यांनी काय बोलावं, मागावं यापेक्षा त्यांचे दु:ख ओळखून आम्ही त्यांना मदत करणार आहोत, बिहारला जाण्याऐवजी दिल्लीत जावं मग पंतप्रधानही घराबाहेर पडतील, केंद्र सरकार हे देशाचे सरकार आहे, परदेशाचं सरकार नाही, राज्याची आणि देशाची काळजी घेणे हे सरकारचं कर्तव्य आहे, पक्षपातीपणाने बघू नये. बिहारमध्ये प्रचाराला जाण्यापेक्षा राज्यातील संकटासाठी एकत्र येऊन केंद्राकडे जाऊन मदत मागूया. मी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बसलो नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकाचं नुकसान झालं आहे, जनावरांना चाराही उरला नाही, पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर कोणी आलं नाही, १०० टक्के शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे पंचनामे वैगेरे या भानगडीत न पडता तात्काळ मदत केली पाहिजे, जनावारांना चारा दिला पाहिजे, त्यासाठी राज्य सरकारने पाऊलं उचलावी, अतिवृष्टी झाल्यानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे, परंतु राज्य सरकारने प्राथमिक जबाबदारी ओळखून तात्काळ मदत केली पाहिजे, मागील वर्षी पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर मी १० हजार कोटी तातडीने मदत जाहीर केली, केंद्र सरकारचं पथक येईल, नुकसान भरपाईचा आढावा घेईल, राज्य सरकारने जबाबदारी झटकून चालणार नाही, केंद्र सरकार मदत करणार आहे, पण तोपर्यंत राज्य सरकारने मदत करायला हवी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केली होती.
तर सोयीस्कर राजकीय भूमिका कोणीच घेऊ नये, मदत कशी मिळते हे सगळ्याच नेत्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको, ही त्यांची मागणी आहे. राज्यपालांचे एखादे वाक्य आणि त्यावरील विवाद ही वेळ नाही, राज्यपालांसोबत मनभेद असतील तर यापुढे होतील, पण आता शेतकऱ्यांना काय मदत मिळणार हे पाहणे गरजेचे आहे. शरद पवारांना सरकारला पाठिशी घालावं लागतंय, या सरकारला पाठिशी घालणं एवढचं काम सरकारकडे आहे. राज्य सरकारविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. आमचा दौरा घोषित होईपर्यंत कोणताही पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकले नव्हते, आम्ही दौरा करायला लागल्यामुळे सगळेजण आता घराबाहेर पडले आहेत असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला होता. त्यावर सोलापूरच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी प्रतिटोला हाणला आहे.