पुणे : बारामतीमध्ये यायला देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना आवडते. बारामती पॅटर्न विषयी त्यांचे काय मत आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मी त्यांचे स्वागतच करते. ‘अतिथी देवो भव’, असे म्हणत बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसेच खडकवासला मतदारसंघात सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरे व त्यांच्या पक्षाचा आहे. मी त्यांना सुचना केलेली नाही, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. कांचन कुल यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील बारामतीत तंबु ठोकून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा होण्याची शक्यता असून मुख्यमंत्रीही सभा घेणार आहेत. सुळे यांच्यासाठी यंदाची निवडणुक कठीण असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा याच मतदारसंघात होणार आहे. त्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीला भाड्याने नेते बोलवावे लागत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावर पत्रकार परिषदेत बोलताना सुळे म्हणाल्या, प्रत्येक पक्ष जिंकण्यासाठी लढत असतो. त्यातच चुकीचे काहीच वाटत नाही. बारामती मध्ये यायला सगळ््यांनाच आवडते. आमच्यावर टीका करायला काहीच मुद्दा नाही. त्यामुळे आता राज ठाकरेंवर टीका केली जात आहे. आतापर्यंत झालेल्या सभांमध्ये आमच्यावर धोरणात्मक टीका होत नाही. केवळ वैयक्तिक टीका केली जात आहे. बाहेरून येणारा एकही नेता दुष्काळ, बेरोजगारीवर बोलत नाही.
मित्रपक्षातील नेत्यांच्या नाराजीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील यांच्याशी अनेक वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध आहेत. संजय जगताप, संग्राम थोपटे यांच्या रोज संपर्कात असेत. सगळ््यांचा एकत्रित प्रचार सुरू आहे. इंदापुरच्या जागेबाबत पक्षाध्यक्ष निर्णय घेतील. राष्ट्रवादीच्या भुमिकेबाबत केवळ संभ्रम निर्माण केला जात आहे. पार्थच्या प्रचारासाठी मावळमध्ये जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्मृती इराणींची कृती दुर्देवी
स्मृती इराणी यांच्या पदवीवरून सुरू असलेल्या वादाला सुळे म्हणाल्या, स्मृती इराणी यांच्याशी अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. ‘शपथपत्र’ महत्वाचे असून अधिकृत कागदपत्र असते. त्यामुळे त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे दुर्देवी आहे.