मुंबई – बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार(Dilip Kumar) यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर अनेक सेलेब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या घरी जाऊन दिलीप कुमार यांची पत्नी सायराबानो यांचे सांत्वन केले. शासकीय इतमामात दिलीप कुमार यांच्यावर जुहू येथे कब्रस्तानात दफन करण्यात आले.
दिलीप कुमार यांच्या निधनाची वार्ता समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनीही त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले. मात्र यावरून भाजपा आमदार नितेश राणे(BJP NItesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटलंय की, महाराष्ट्र सरकारच्या अपयशामुळे ज्या स्वप्निल लोणकरनं आत्महत्या केली. त्या स्वप्निलच्या आईची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे वेळ नव्हता. परंतु बाकीकडे जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. दुख:द आहे पण सत्य आहे अशा शब्दात नितेश राणेंनी खंत व्यक्त केली.
दिलीप कुमार यांच्या निधनावर मुख्यमंत्री काय म्हणाले?
भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली. तसेच, दिलीप कुमार यांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शनही घेतले. त्यानंतर, सायरा बानो यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.
काय आहे प्रकरण?
पुण्यात स्वप्निल लोणकर(Swapnil Lonkar) या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बाईंडिंगचा प्रिटिंग प्रेसचा छोटा व्यवसाय आहे. ते व त्यांची पत्नी असे दोघे हा व्यवसाय पाहतात. स्वप्निलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त घेतली होती. स्वप्निलचे आईवडिल हे नेहमीप्रमाणे बुधवारी (३० जून) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्निलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने हा प्रकार आईवडिलांना कळविला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
स्वप्निलचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो एमपीएससीच्या(MPSC) परीक्षेची तयारी करीत होता. तो २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्याची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्वपरीक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करूनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या ‘सुसाईड नोट’वरून आढळून येते.