कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये मुकुल रॉय यांच्या टीएमसी(TMC)मध्ये घरवापसीनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपातून तृणमूल काँग्रेसमध्ये परतल्यानंतर मुकुल रॉय आता भाजपा आमदारांसोबत संपर्कात आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात उभी फूट पडल्याचं दिसून येत आहे. सोमवारी बंगालमधील भाजपा नेते सुवेंद्रु अधिकारी राज्यपाल जगदीप धनखड यांना भेटण्यासाठी पोहचले असता त्यांच्यासोबत ७७ आमदारांपैकी ५१ आमदारच उपस्थित होते. त्यामुळे भाजपात येणाऱ्या काळात मोठ्या बंडखोरीचे संकेत मिळत आहेत.
मुकुल रॉय यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, भाजपातील अनेक लोकांसोबत माझं बोलणं सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि मंत्र्यांसह अनेक नेते भाजपात सामील झाले होते. ज्यातील अनेक नेत्यांनी पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुकुल रॉय यांच्यासोबत तृणमूलमध्ये परतेले त्यांचे चिरंजीव शुभ्रांशू यांनी याबाबत विस्ताराने सांगितले.
भाजपाचे २५-३० आमदार आणि २ खासदार TMC च्या संपर्कात
शुभ्रांशु रॉय म्हणाले की, भाजपाचे जवळपास २५-३० आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये येऊ शकतात त्याशिवाय भाजपाचे २ खासदारही तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. बीजापूरमधून निवडणुकीत पराभव झालेले शुभ्रांशुने त्यांचे वडील दबावाखाली असल्याचं म्हटलं. माझ्या वडिलांच्या तब्येतीवरून ते दिसून येत होते. त्यांनी पूर्वीप्रमाणे यंदाच्या निवडणूक प्रचारात सहभाग घेतला नाही. एकेदिवशी त्यांनी विचारलं की, तू बीजापूरमधून निवडणूक जिंकू शकतो का? तेव्हा ते चिंतेत होते.
मुकुल रॉय यांच्या वक्तव्यावर भाजपा काय म्हणाली?
अलीकडेच भाजपातून टीएमसीत परतलेले मुकुल रॉय म्हणाले की, ते भाजपाच्या अनेक नेत्यांशी संपर्कात आहेत. मात्र मुकुल रॉय यांचा दावा भाजपाने फेटाळून लावला. पक्षातील कोणताही आमदार मुकुल रॉय यांच्या वाटेवर जाणार नाही असं भाजपा म्हणाली आहे.
२५ जणांची बनवली प्राथमिक यादी
भाजपचे जुने नेते आणि कार्यकर्ते यांनाही आपल्या तंबूत ओढण्याचे काम टीएमसीने सुरू केले आहे. सूत्रांनुसार आतापर्यंत २५ जणांची प्राथमिक यादी बनवण्यात आली आहे, तर १०० पेक्षा अधिक भाजप नेते असे आहेत जे त्यांच्या परिसरात वर्चस्व राखून आहेत. मुकुल रॉय यांच्या भरवशावर त्यांनी टीएमसी सोडून भाजपत प्रवेश केला होता. या नेत्यांना टीएमसीत पुन्हा घेण्याची रणनीती आखली जात आहे. आतापर्यंत सब्यासाची दत्ता, राजीव बनर्जी, प्रबीर घोषाल आदी नेत्यांशी मुकुल रॉय यांचा फोनवरून संपर्क झाला आहे. हे नेते टीएमसीत प्रवेश करतील, असे म्हटले जात आहे.
‘ते’ ट्रोजन घोड्यासारखे
मेघालयचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी दावा केला की, मुकुल रॉय ट्रोजन घोड्यासारखे होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून केंद्र आणि राज्यातील नेत्यांची रणनीती माहिती करून घेतली आणि त्याची माहिती ममता बॅनर्जींना दिली.