शीलेश शर्मा नवी दिल्ली : भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांचे नाव कथितरीत्या समाविष्ट असलेली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, यामुळे प. बंगालमध्ये ऐन निवडणुकीत खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये संतोष नावाची व्यक्ती स्वत:साठी भाजपची उमेदवारी मागण्यासाठी पैशांच्या देवाण-घेवाणीची चर्चा करत आहे. यात मुलींची मागणी, लैंगिक छळाचाही उल्लेख आहे.
कैलाश विजयवर्गीय व भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्याशी तिकिटाबाबत चर्चा करणारा संतोष यांना सांगत आहे की, दोन्ही नेते शौकीन आहेत. दिलीप घोष यांना शिवीगाळ करताना हा कथित नेता संतोष यांना म्हणत आहे की, दिलीप घोष आमच्या शब्दाबाहेर नाहीत. ते विश्वास देतात की, जीतूभाईने तिकीट देण्याचे काम सुरू केले आहे. तिकीट नाही मिळाले तर तुमचे पैसे परत. सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप प. बंगालमधील वरिष्ठ पत्रकार सीमा सेन गुप्ता यांनी व्हायरल केली आहे. सरकार आणि भाजपने याबाबत खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
पक्षाच्या संसद सदस्य अमी याग्निक आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे की, लैंगिक छळाचा हा मुद्दा गंभीर आहे. याची चौकशी व्हायला हवी. काँग्रेसने ती ऑडिओ क्लिपही जारी केली आहे, ज्यात कथित आरोप लावण्यात आले आहेत.
भाजपचे बळ वाढणार, सत्ता नाही- प्रशांत किशोर कोलकाता : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या निकालाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच थेट लढाई आहे. निकालानंतर भाजपला सत्ता मिळणार नाही हे निश्चित आहे. मात्र राज्यात भाजपचे बळ वाढेल, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
बंगालमधील सद्यस्थितीत जी राजकीय परिस्थिती आहे ते पाहता ममता बॅनर्जी याच मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. मात्र भाजपच्या निकालांची देखील दखल घ्यावीच लागेल. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रवेश झाला असून त्यांचा पराजय झाला तरी ते एक मजबूत पक्ष म्हणून समोर येतील, असे भाकीत प्रशांत किशोर यांनी वर्तविले आहे.
भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार गुलदस्त्यातविधानसभा निवडणुकांचा प्रचार रंगात आला असताना भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील प्रचारसभेदरम्यान नाव गुलदस्त्यातच ठेवले. भाजपची सत्ता आली तर बाहेरील नव्हे, तर स्थानिक नेताच मुख्यमंत्री होईल, असे त्यांनी प्रतिपादन केले.
तृणमूल काँग्रेसकडून बंगालला आपली मुलगी हवी अशी मोहीम सुरू करण्यात आली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व प्रचाराला येणाऱ्या नेत्यांना निवडणुकीचे पर्यटक असे संबोधण्यात येत आहे. बंगालने संपूर्ण भारताला वंदे मातरम् च्या भावनेत बांधले आहे. मात्र, त्याच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उमेदवारांना बोहिरागोतो म्हणजे बाहेरचा असल्याचा दावा करत आहेत.