दोनदा पुढे ढकलूनही सभा का होत नाही? भाजपच्या खासदाराचा अप्रत्यक्षपणे अमित शहांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 04:46 PM2021-03-15T16:46:08+5:302021-03-15T16:52:45+5:30
West Bengal Assembly Election 2021: सुब्रमण्यम स्वामींचा ट्विटरवर सवाल; अमित शहांच्या ढकलण्यात आलेल्या सभेवरून निशाणा
नवी दिल्ली/कोलकाता: चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. यापैकी पश्चिम बंगालच्या सत्तासंघर्षाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा सामना पश्चिम बंगालमध्ये आहे. ममता बॅनर्जींकडून पश्चिम बंगाल खेचून घेण्यासाठी भाजपनं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालमध्ये होते. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बंगाल दौऱ्यावर आहेत. शहा त्यांच्या दौऱ्यादरम्यान जनसभांना संबोधित करणार आहेत. पण बांकुरा जिल्ह्यातील त्यांची सभा दोनवेळा पुढे ढकलण्यात आली. सभेची वेळी दोनदा बदलली गेली. आता यावरून भाजपचेच खासदार सुब्रमण्यम स्वामींनी शहांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
अमित शाहंचा ममता बॅनर्जींवर पलटवार; म्हणाले, "हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, पण मी याला षडयंत्र..."
'पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागातील अमित शहांच्या पूर्वनियोजित ऐतिहासिक जनसभेचं प्रक्षेपण पाहण्यासाठी टीव्ही लावला. पण सभा दोनदा पुढे ढकलण्यात आल्यानंतर वृत्तवाहिन्यांनी त्याबद्दल कोणतीही अपडेट दिली नाही. काही कारण कळेल का?,' असा सवाल स्वामींनी विचारला आहे. स्वामींच्या या प्रश्नावर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. गर्दी जमली नसेल, पेट्रोल महागल्यानं भाजप कार्यकर्त्यांना दुचाकी परवडत नसेल, अशी प्रतिक्रिया स्वामींच्या ट्विटखाली वाचायला मिळत आहेत.
I tuned into TV Channels for a pre announced Amit Shah’s historic address in a Bengal rural area. But after two postponements on the scheduled time the Channels went silent on the broadcast. Any reason?
— Subramanian Swamy (@Swamy39) March 15, 2021
काय म्हणाले अमित शहा?
सभास्थळी उशिरा दाखल झालेल्या अमित शहांनी उपस्थितांची माफी मागत ममता बॅनर्जींना टोला लगावला. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मला येण्यास उशीर झाला. परंतु मी याला षडयंत्र म्हणणार नाही, असा खोचक टोला शहांनी लगावला. गेल्याच आठवड्यात नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जींवर हल्ला झाला. त्यावरून बॅनर्जी भाजपवर बरसल्या होत्या. हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला होता.