West Bengal Assembly Election 2021: "कूचबिहार गोळीबार पूर्वनियोजित, केंद्रातून रचला कट, अमित शहांनी राजीनामा द्यावा", ममता बॅनर्जी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 06:37 PM2021-04-10T18:37:55+5:302021-04-10T18:46:36+5:30

West Bengal Assembly Election 2021 Mamata Banerjee Slams Amit Shah : कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आपापसात भिडले. या हाणामारीत अनेक लोक जखमी झाले आहेत.

west bengal assembly election 2021 mamata banerjee attacks on home minister amit shah over cooch bihar violence | West Bengal Assembly Election 2021: "कूचबिहार गोळीबार पूर्वनियोजित, केंद्रातून रचला कट, अमित शहांनी राजीनामा द्यावा", ममता बॅनर्जी कडाडल्या

West Bengal Assembly Election 2021: "कूचबिहार गोळीबार पूर्वनियोजित, केंद्रातून रचला कट, अमित शहांनी राजीनामा द्यावा", ममता बॅनर्जी कडाडल्या

googlenewsNext

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान करण्यात आलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आपापसात भिडले. या हाणामारीत अनेक लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान बूथ क्रमांक 285 मध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार करण्यात आला. यामध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या  गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी झाले आहेत. यावरून ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपा आणि अमित शहांवर (Amit Shah) जोरदार हल्लाबोल केला आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी "कूचबिहारचा गोळीबार पूर्वनियोजित होता. गृहमंत्री अमित शहांच्या निर्देशावर कट रचण्यात येतो" असा गंभीर आरोप केला आहे. तसेच  कूचबिहारमध्ये गोळीबाराविरुद्ध एक रॅली काढून घटनास्थळालाही भेट देणार असल्याचं ममता दीदींनी म्हटलं आहे. अमित शहांच्या राजीनाम्याची देखील त्यांनी मागणी केली आहे. सीआयएसएफवर मतदानासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या मतदारांवर गोळीबार करण्याचा आरोप केला आहे. या घटनेचा कट केंद्रातून रचण्यात आल्याचा आरोप करताना 'अमित शहांनी या घटनेचं उत्तर द्यावं' असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. 

"आज घडलेल्या घटनेस पूर्णपणे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. नव्हे त्यांनीच हा कट रचला आहे. मी केंद्रीय दलांना दोष देत नाही कारण ते गृहमंत्र्यांच्या आदेशाखाली काम करतात. माझा विश्वास आहे की कूचबिहारमधील गोळीबाराची घटना ही पूर्वनियोजित होती. मी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देणार आहे. आम्ही गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. 

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आनंद बर्मन नावाच्या तरुणाला बाहेर ओढत आणण्यात आलं आणि गोळी मारुन त्याची हत्या केली. घटनेच्या वेळी मतदान सुरू होतं. या घटनेनंतर भाजपा आणि तृणमूलच्या समर्थकांमध्ये झडप झाली. यात बॉम्बही फेकण्यात आल्याने अनेक लोक जखमी झाले. केंद्रीय दलांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. तरुणाच्या कुटुंबीयांनी तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप केला आहे. 

बापरे! पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान मोठा हिंसाचार; गोळीबारात चौघांचा मृत्यू, 4 जण जखमी

हत्या झालेला तरुण हा भाजपाचा समर्थक होता. त्यामुळेच त्याला गोळी मारल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने यात भाजपाचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपाने हा तरुण मतदान केंद्रावर पोलिंग एजंट होता असा दावा केला आहे. तसेच याच दरम्यान भाजपा उमेदवार लॉकेट चॅटर्जी यांच्या कारवर देखील हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये चॅटर्जी यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. लॉकेट चॅटर्जी यांनी यासाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: west bengal assembly election 2021 mamata banerjee attacks on home minister amit shah over cooch bihar violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.