नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परदेश मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणारे यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपामधून राजीनामा दिल्यानंतर यशवंत सिन्हा दीर्घकाळापासून सक्रीय राजकारणातून दूर होते. त्यानंतर सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं. यशवंत सिन्हा यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "बंगालच्या निवडणुका हरले तर मोदी-शहा राजीनामा देणार का?" असं टीकास्त्र सोडलं आहे.
यशवंत सिन्हा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत निशाणा साधला आहे. "बंगालच्या निवडणुका हरल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आपल्या पदाचा राजीनामा देणार का?" असा प्रश्न यशवंत सिन्हा यांनी विचारला आहे. तसेच "या निवडणुकीत ते स्वतः ज्याप्रकारे प्रचारात उतरलेत…त्यानंतरही जर पराभव झाला तर स्वाभिमान राखून त्यांनी किमान राजीनामा द्यायला हवा…पण प्रतिष्ठा नसलेल्या लोकांकडून मी जरा जास्तच अपेक्षा ठेवतोय हे मला माहीत आहे" असं देखील यशवंत सिन्हा यांनी म्हटलं आहे.
'ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये जो हल्ला झाला. तो टिपिंग पॉईंट होता. तेव्हाच मी तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा आणि ममतांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला' असं यशवंत सिन्हा यांनी याआधी म्हटलं आहे. तसेच सिन्हा यांनी भाजपावर देखील हल्लाबोल केला होता. "अटल बिहारी वाजपेयींच्या काळात भाजपाचा सर्वसाधारण सहमतीवर विश्वास होता. मात्र आजच्या सरकारचा केवळ दडपशाही आणि जिंकण्यावर विश्वास आहे. अकाली दल, बीजेडी देखील भाजपामधून वेगळे झाले आहेत. आज भाजपासोबत कोण उभं आहे?' अशा शब्दांत यशवंत सिन्हा यांनी भाजपावर निशाणा साधला होता.
आयएएसची नोकरी सोडून यशवंत सिन्हा राजकारणात दाखल झाले होते. चंद्रशेखर सरकारमध्येही ते मंत्री होते. अटल बिहारी वाजपेयींच्या ते अगदी जवळचे नेते होते. परंतु, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा मात्र वेगळी असल्याचं मत त्यांनी अनेकदा व्यक्त केलं. यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारचा अनेकदा विरोध केला होता. मोदींच्या आर्थिक धोरणांसहीत परराष्ट्र धोरणांवरही त्यांनी अनेकदा उघडपणे टीका केली होती. यशवंत सिन्हा यांचा मुलगा जयंत सिन्हा हे मात्र भाजपाचे खासदार आहेत.