कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Assembly Election) भारतीय जनता पार्टीचे(BJP) २ आमदार लवकरच राजीनामा देण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, भाजपाचेआमदार जगन्नाथ सरकार आणि दिनहाटा येथून आमदार निसिथ प्रमाणिक आमदारकी सोडण्याच्या तयारीत आहेत. हे दोघंही पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्ष बिमान बनर्जी यांच्याकडे येत्या २ आठवड्यात राजीनामा देऊ शकतात. भाजपा नेतृत्वाला वाटतंय की, या दोघांनी खासदार म्हणून काम सुरु ठेवावं कारण एका मतदारसंघाऐवजी ७ मतदारसंघात लोकांची काम करून पक्ष वाढवता येईल.
जगन्नाथ सरकार पश्चिम बंगालच्या राणाघाट लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत तर निसिथ प्रमाणिक हे २०१९ च्या निवडणुकीत कूच बिहार लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या या २ आमदारांच्या राजीनाम्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेतील एकूण ५ जागा रिक्त राहतील. मुर्शिदाबादच्या शमशेरगंज आणि जंगीपर विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या मृत्यूनंतर निवडणूक घेता आली नव्हती. तर उत्तरी २४ परगनाचे खारदा येथे आमदार म्हणून निवडून आलेले तृणमूल काँग्रेसचे(TMC) काजल सिन्हा यांचं विजयाचा जल्लोष करण्यापूर्वीच निधन झालं.
मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की, विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले खासदार हे आमदारकी कायम ठेवणार की राजीनामा देणार? आता या दोन्ही खासदारांनी पक्षाच्या सांगण्यावरून आमदार पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बंगालमध्ये भाजपाने ४ खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. यातील २ जण जिंकले तर दोघांचा पराभव झाला. विजयी उमेदवार निसिथ प्रमाणिक आणि जगन्नाथ सरकार यांनी जर आमदारकी कायम ठेवली तर त्यांच्या रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघात पुन्हा फेरनिवडणूक घ्यावी लागू शकते. त्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता लोकसभा निवडणुकीत २ जागा कायम राहतील का याबाबत भाजपाला चिंता वाटते. कारण २०२१ च्या निकालात चित्र बदललं आहे. ममता बॅनर्जी(Mamta Banerjee)यांनी २१३ जागा जिंकत राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार
पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जोरदार राजकीय हिंसाचार घडला. २ मे रोजी निकाल आल्यानंतरही हिंसाचाराच्या घटना थांबल्या नाहीत. भाजपाच्या दाव्यानुसार, राजकीय हिंसाचारात पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचाराच्या घटनांसाठी भाजपाने तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. २ मे रोजी निकाल आला त्यानुसार तृणमूल काँग्रेसला २१३ जागांवर मोठा विजय मिळाल्यानं पश्चिम बंगालमध्ये निर्विवाद बहुमत प्राप्त झालं आहे. जर भाजपाला ७७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. एका जागेवर अपक्षाने बाजी मारली तर १ जागा राष्ट्रीय सेक्युलर मजलिस पार्टीच्या खात्यात गेली आहे. अनेक दशकांपासून पश्चिम बंगालमध्ये राज्य करणाऱ्या काँग्रेस आणि डाव्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.