पठार प्रतिमा (पश्चिम बंगाल) : पहिल्या टप्प्याचे मतदान जवळ आले असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. अल्पसंख्याकांच्या मतांसाठी भाजपचे नवीन पक्षाला समर्थन असल्याचा दावा करत माकपा व काँग्रेसने भाजपसोबत हातमिळावणी केल्याचा आरोप लावला. ममता बॅनर्जी यांचा रोख इंडियन सेक्युलर फ्रंटकडे होता. प्रचार सभेदरम्यान त्या बोलत होत्या.
भाजपच्या इशाऱ्यावरून राज्यात एक राजकीय पक्ष निर्माण झाला आहे. अल्पसंख्याकांची मते मिळविणे व भाजपला मदत करणे हा त्याचा उद्देश आहे, असे ममता म्हणाल्या. मुस्लीम उलेमा अब्बास सिद्दीकी यांनी आयएसएफची स्थापना केली. ते डावे-काँग्रेसच्या आघाडीला समर्थन करत आहेत. राज्यात नागरिकता संशोधन कायदा व एनपीआर लागू करण्यासाठी केवळ तृणमूल काँग्रेसच थांबवू शकते. मला विरोधक चोर व हत्या करणारी म्हणत आहेत. मात्र, मी जनतेला आपले मानते व त्यांच्यासाठी मी धावून जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे तर चोरांचे सरदार असल्याची टीका त्यांनी केली.
पश्चिम बंगालमध्ये प्रचारतोफा थंडावल्यापश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शनिवारी, २७ मार्च रोजी होणार आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावल्या. पहिल्या टप्प्यात ३० जागांसाठी मतदान होईल. एकेकाळी डाव्यांचा प्रभाव असलेल्या या जागांवर तृणमूल व भाजपनेदेखील संपूर्ण ताकद लावली आहे.
चकमकीत तृणमूल कार्यकर्त्याचा मृत्यूमाकप आणि इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) या आघाडीशी झालेल्या संघर्षात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता ठार झाला, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.