West Bengal Results 2021: ममतादीदींच्या तृणमूलने ओलांडला बहुमताचा आकडा; भाजपा 'नर्व्हस नाईंटी'त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 10:59 AM2021-05-02T10:59:08+5:302021-05-02T11:18:39+5:30
West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: ऐन निवडणुकीत एका छोट्या अपघातात जायबंदी झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून पिछाडीवर आहेत. भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना 8106 मतांनी मागे टाकले आहे.
West Bengal Assembly Election Result 2021 Highlights : आजच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाची हाय व्होल्टेज सीट असलेल्या नंदीग्रामकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) जिंकणार की पडणार याकडे लक्ष लागलेले असतानाच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपाला खूप मागे टाकले आहे. एक वेळ अशी होती की तृणमूल आणि भाजपा समसमान जागांवर आघाडीवर होते. परंतू आता हे अंतर मोठे होऊ लागल्याने तृणमूलच्या गोटात आनंदाचे वातावरण परतू लागले आहे. (TMC took lead in West bengal over BJP. Mamata banerjee is trailing from Nandigram.)
सध्याच्या कलांनुसार भाजपाला 98 जागांवर आघाडी मिळाली असून तृणमूल काँग्रेसला 188 जागांवर आघाडी मिळाली आहे. म्हणजेच तृणमूलने भाजपाला जवळपास 90 जागांनी मागे टाकले आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेसाठी 148 जागांची गरज आहे. येथे 294 पैकी 292 जागांवर मतदान झाले आहे. West Bengal Assembly Election Result 2021 Highlights: TMC left behind BJP; but Mamata Banerjee trailing by 8106 votes
दुसरीकडे ऐन निवडणुकीत एका छोट्या अपघातात जायबंदी झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून पिछाडीवर आहेत. भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी त्यांना 8106 मतांनी मागे टाकले आहे. यामुळे सध्या बंगालमध्ये 'गड आला, पण सिंह गेला' अशी अवस्था होण्याची शक्यता दिसू लागली आहे.
देशभरात आजचा दिवस कोरोना काळातील हायव्होल्टेज निवडणुकांच्या निकालाचा आहे. निवडणूक आयोगाने कोणीही जल्लोष करू नये असे आदेश दिले आहेत. तरीही ही निवडणूक भाजपासाठी मोठा जल्लोष करण्यासारखी असणार आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये 3 वरून तीन आकडी जागा मिळविताना ममता बॅनर्जी यांचा पराभव आणि त्यांच्या सत्तेचे पतन अशा दोन गोष्टी भाजपाला साधण्याची संधी चालून आली आहे.
देशभरात जवळपास 822 मतदारसंघांमध्ये निवडणूक झाली आहे, यापैकी नंदीग्राम ही अशी एकच सीट आहे जी या साऱ्यांवर भारी पडली आहे. कारण ममता या अधिकारी यांना काहीही करून पाडणार याच निश्चयाने तिथे लढत आहेत. नंदीग्रामची जागा 2009 पासून तृणमूलच्या ताब्यात आहे. 2016 मध्ये तिथे तृणमूलला एकूण 87 टक्के मतदान झाले होते. सुवेंदू अधिकारी यांनी सीपीएमच्या अब्दुल कबीर यांचा 81,230 मतांनी पराभव केला होता. हाच मतदारसंघ बंगालचे पुढील राजकारण आणि सत्तासंघर्षाची दिशा निश्चित करणार आहे. नंदीग्राममधून आठ जण निवडणूक लढवत आहेत.
काय होती घटना...
ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामयेथून शेतजमिन अधिग्रहण करण्याविरोधात आंदोलन सुरु केले होते. जानेवारी 2007 मध्ये सीपीएमचे आंदोलक आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. तर 14 मार्च 2007 या दिवशी नंदीग्राममध्ये 14 लोकांचा पोलीस फायरिंगमध्ये मृत्यू झाला.