बांकुरा - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत नशिब आजमवणारी सर्वात गरीब उमेदवार चंदना बाऊरी होत्या. भाजपाने चंदना यांना सल्तोरा विधानसभा मतदारसंघातून उभं केलं होतं. राज्यात तृणमूल काँग्रेसच्या चांगल्या प्रदर्शनामध्येही चंदना बाऊरी यांना विजय मिळवण्यात यश आलं आहे. ३० वर्षाची चंदना बाऊरी या एका मजुराची पत्नी आणि ३ मुलांची आई आहे.
बांकुरा जिल्ह्यातील सल्तोरा विधानसभा निवडणुकीत भाजपाने चंदना बाऊरी यांना तृणमूल काँग्रेसचे उमेदवार संतोष कुमार मंडल यांच्याविरोधात उतरवलं होतं. या निवडणुकीत चंदना यांनी ४ हजार १४५ मतांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. भाजपाचं तिकीट मिळाल्यानंतर एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, मला याबाबत अजिबात कल्पना नाही. भाजपाच्या उमेदवारांच्या यादीत स्थानिक नेतृत्वाने चंदना बाऊरी यांना उमेदवारी देण्याची शिफारस केली होती.
निवडणुकीच्या आधी भाजपात सहभागी झालेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी सल्तोरा विधानसभा क्षेत्रात जाऊन चंदना यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला होता. त्यानंतर चंदना बाऊरी म्हणाल्या होत्या की, मिथून चक्रवर्ती यांच्याकडून माझ्या विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ होणं हे माझ्यासाठी गर्वाची गोष्ट होती.
कोण आहेत चंदना बाऊरी?
चंदना बाऊरी या ३ मुलांची आई आहे. ती आपल्या दोन मुली आणि एका मुलाला तिच्या आई आणि सासूकडे घरात ठेऊन निवडणुकीच्या प्रचारासाठी बाहेर फिरत होती. कधी कधी तिचे पती जे एका बांधकाम व्यावसायिकाकडे मजुरीचं काम करतात तेदेखील प्रचाराला जात होते. चंदना सल्तोरा मतदारसंघात २०१४ पासून भाजपा कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. २०१८ च्या पंचायत निवडणुकीत त्या पहिल्यांदा ग्राम पंचायत सदस्य बनल्या होत्या. तर २०१९ मध्ये चंदना बाऊरी या बांकुरा जिल्हा समितीवर सदस्य झाल्या. चंदनाच्या मते, भाजपात श्रीमंत अथवा गरीब असा कोणताही भेद नाही. भाजपा सर्वांची आहे. भाजपाने मला सन्मान दिला त्यासाठी मी पक्षाची आभारी आहे.
याशिवाय भाजपाने पूर्व बर्दवानच्या आशाग्राम येथून कलिता माझीला उमेदवारी दिली होती. कलिता एक सामान्य घरातील महिला आहे. जी घर काम करून तिचं आयुष्य जगते. निवडणुकीच्या प्रचारावेळी तिला काम करण्यासाठी समस्या जाणवली तेव्हा तिने महिनाभरासाठी कामाला सुट्टी घेतली. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराला यांनीही जोरदार टक्कर दिली. परंतु त्या पिछाडीवर राहिल्या आहेत.