कोलकाता - संपूर्ण देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीला २७ मार्चपासून सुरुवात होत आहे. (West Bengal Assembly Elections 2021 )आज संध्याकाळी राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीचा प्रचार संपणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. या प्रचारादरम्यान, काही नेते पातळी सोडून आक्षेपार्ह विधाने करत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आलम यांनी असेच एक संतापजनक विधान केले आहे. ( "30 per cent Muslims unite, four Pakistan will be formed in India," says Trinamool leader Sheikh Alam)
मिळत असलेल्या माहितीनुसार वीरभूम जिल्ह्यातील नानूर विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विधानचंद्र मांझी यांचा प्रचार करण्यासाठी शेख आलम हे आले होते. त्यावेळी शेख आलम म्हणाले की, जर भारतातील ३० टक्के मुसलमान एकजूट झाले तर भारतामध्ये चार नवे पाकिस्तान बनू शकतात. दरम्यान, शेख आलम यांच्या विधानावरून भाजपाने तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली आहे. आलम यांच्या या विधानावर भाजपाचे पश्चिम बंगालमधील सह प्रभारी अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जींना सवाल विचारला आहे. ममता बॅनर्जी आलम यांच्या विधानाला पाठिंबा देतात काय. आपल्याला असा बंगाल हवा आहे का? असा सवाल अमित मालवीय यांनी विचारला आहे.
दरम्यान २०१६ च्या विधानसभा निवडणुकीवेळीही अशाच प्रकारचे विधान एका मंत्र्याने केले होते. त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हुसेन यांनी मिनी पाकिस्तानचा उल्लेख केला होता. फिरहाद हकीम पाकिस्तानच्या एका पत्रकाराला मी तुम्हाला आता कोलकाताधील मिनी पाकिस्तानमध्ये घेऊन जातो, असे म्हटले होते. त्यावेळी त्यांच्या या विधानावर जोरदार टीका झाली होती.