नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपा नेते प्रलय पाल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपल्याला फोन करून नंदीग्राममधील विजयासाठी मदत मागितली असल्याचा दावा प्रलय पाल (Pralay Pal) यांनी केला आहे. पाल यांच्या या दाव्याने बंगालच्या राजकारणात चांगलाच खळबळ उडाली आहे. मात्र याता यावर ममता बॅनर्जींनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. "हो, मी भाजपा नेत्याला फोन केला होता" असं म्हणत त्यामागचं नेमकं कारण आता ममतांनी सांगितलं आहे. टीएमसीने आधी या फोनचा दावा फेटाळून लावला होता. पण आता ममता बॅनर्जींनी फोन केल्याचं समोर आलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी "तृणमूल काँग्रेसच्या एका माजी नेत्याला ज्याने भाजपमध्ये प्रवेश केला. त्याला आपण फोन केला होता. फोन करणं कुठलाही गुन्हा नाही. दोषी त्यांना ठरवलं पाहिजे, त्यांनी विश्वासघात केला आणि चर्चा लीक केली" असं म्हटलं आहे. तसेच "हो, मी नंदीग्राममधील एका भाजपा नेत्याला फोन केला होता. कोणाला तरी आपल्याशी बोलायचं, असं सांगण्यात आलं होतं. यामुळे त्यांचा नंबर घेऊन आपण फोन केला होता. तुम्ही तिथे व्यवस्थित राहा आणि आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असं मी त्यांना म्हणाले होते. हा काय माझा गुन्हा आहे का?" असा सवाल देखील ममता बॅनर्जींनी केला आहे.
"मतदार संघातील उमेदवार असल्याच्या नात्याने मी कुठल्याही मतदाराची मदत घेऊ शकते. मी कुणालाही फोन करू शकते. यात वाईट काय आहे. या कुठला गुन्हा नाही. पण जर कुणी बातचीत लीक करत असेल तर तो गुन्हा आहे. हा गुन्हा माझ्याविरोधात नाही तर त्या व्यक्तीविरोधात ज्याने माझ्याशी झालेली चर्चा लीक केली" असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपाचे विद्यमान आमदार शुभेंद्रू अधिकारी लढत आहेत. प्रलय पाल यांनी हा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे.
"ममता बॅनर्जींनी मला फोन करून नंदीग्राममध्ये मागितली मदत", भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट
ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सकाळी मला फोन केला होता. नंदीग्राममध्ये मदत करण्याची विनंती त्यांनी केली होती असं पाल यांनी म्हटलं आहे. या संभाषणाची एक ऑडिओ क्लिपही भाजपाने व्हायरल केली आहे. तर ऑडिओ क्लिपमधील आवाज व्हेरिफाईड नसल्याचं टीएमसीने म्हटलं आहे. "मी त्यांच्यासाठी काम करावं आणि टीएमसीमध्ये प्रवेश करावा असं ममता बॅनर्जींचं म्हणणं होतं. परंतु मी गेल्या अनेक वर्षांपासून शुभेंदू अधिकारी यांच्या कुटुंबासोबत आहे. आता मी भाजपासाठी काम करत आहे" असं पाल यांनी म्हटलं आहे.
"डाव्यांच्या सत्तेच्या काळात अत्याचार वाढले होते. तेव्हा नंदीग्रामच्या जनतेच्यापाठी फक्त अधिकारी कुटुंबच उभं राहिलं होतं. मी कधीच अधिकारी कुटुंबाच्या विरोधात गेलो नाही आणि यापुढेही कधी अशी हिंमत करणार नाही" असं देखील पाल यांनी म्हटलं आहे. नंदीग्राममधील लोकांना टीएमसीने कधीच त्यांचा अधिकार मिळवून दिला नाही. त्यामुळे मी भाजपाची सेवा करत राहणार आहे, असं ममता दीदींना सांगितल्याचंही पाल म्हणाले. अधिकारी निवडून यावेत मन आम्ही जीवाचं रान करू असंही त्यांनी सांगितल्याचं म्हटलं आहे. भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी ट्विट केलं आहे.