नवी दिल्ली/कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदिग्राम येथे प्रचारादरम्यान जखमी झाल्याने मोठ्या राजकीय वादाला तोंड फुटले होते. आपल्यावर प्रतिस्पर्धी भाजपाकडून हल्ला करण्यात आल्याचा दावा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत होता. (West Bengal Assembly Elections 2021 ) तर ममता बॅनर्जी ह्या खोटे बोलत असल्याचा दावा भाजपाकडून येत होता. दरम्यान, ममता बॅनर्जींसोबत घडलेली घटना ही घातपात नसून अपघात असल्याचे निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले. मात्र तरीही या प्रकरणी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. (The incident with Mamata Banerjee was not an accident but an accident, yet the Election Commission took big action)ममता बॅनर्जींना नंदिग्राममध्ये झालेल्या दुखापतीप्रकरणी निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जींच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच पूर्व मिदनापूर जिल्ह्याचे डीएम आणि एसपींनाही पदावरून हटवण्यात आले आहे. बुधवारी ममता बॅनर्जी नंदिग्राममध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या कारच्या फूटबोर्डवर उभ्या राहून उपस्थितांना अभिवादन करत होत्या. त्यावेळी गर्दीतून कुणीतरी त्यांना धक्का दिला. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना नंदिग्राम येथून कोलकाता येथे आणण्यात आले होते. तसेच उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, ममता बॅनर्जींनी आज व्हिलचेअरवर बसून पक्षासाठी एका रोड शोचे नेतृत्व केले. यावेळी जखमी वाघ अधिक धोकादायक असतो, असे आव्हानही ममता बॅनर्जींनी दिले. यावेळी टीएमसीचे अनेक वरिष्ठ नेते त्यांच्यासोबत होते. ममता बॅनर्जी हात जोडून लोकांचे अभिवादन स्वीकारत होत्या. तर सुरक्षारक्षक त्यांची व्हीलचेअर पकडून पुढे नेत होते.