नवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections 2021) पहिल्या टप्प्यात भरघोस मतदान झाल्याचे पाहायला मिळले. यानंतर पुन्हा एकदा प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसने ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची केल्याचे सांगितले जात आहे. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज नंदीग्राममध्ये रोड शो केला. यानंतर त्यांनी सभा घेत भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपा कार्यकर्त्याच्या आईच्या निधनावर बोलत त्यांनी महिलांवरील हिंसेला समर्थन करत नसल्याचं सांगितलं आहे.
महिलेच्या मृत्युचं खरं कारण माहीत नसल्याचंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी भाजपा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर (Amit Shah) जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाशासित राज्य उत्तर प्रदेशमध्ये तरुणीवर अत्यावर करून तिची हत्या केली गेली. त्यावेळी अमित शहा का गप्प होते?, असा बोचरा सवाल ममता यांनी केला आहे. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात गेल्या महिन्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या आईला मारहाण केली होती. यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
"मी बहिणी आणि मातांवरील हिंसाचाराचे समर्थन केलेलं नाही"
ममता बॅनर्जींनी यावर नंदीग्राममधील जाहीरसभेतून स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांचा मृत्यू कसा झाला हे आपल्याला माहिती नाही. पण आम्ही महिलांवरील हिंसाचाराचे समर्थन करत नाही. मी बहिणी आणि मातांवरील हिंसाचाराचे समर्थन केलेलं नाही असं म्हटलं आहे. भाजपा या मुद्द्यावरून आता राजकारण करत आहे. बंगालमध्ये किती बिकट स्थिती आहे असं अमित शहा ट्वीट करत आहेत. पण उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये जेव्हा एका तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केली गेली त्यावेळी अमित शहा गप्प का होते?, असा प्रश्न ममतांनी आता विचारला आहे.
"राज्यात सध्या आचारसंहिता लागू आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्था ही निवडणूक आयोगाच्या हाती आहे. गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे" असा आरोप देखील ममतांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या रॅलीदरम्यान अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला होता. यानंतर ते आता जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. भाजपाने आपल्या उमेदवारांची शेवटची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर केली. यामध्ये मिथुन यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नव्हता. मात्र त्यानंतर आता मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार होण्यास आपली तयारी आहे.
"मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार"
पक्षाने आता काय तो निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे. तसेच मोदींनी आदेश दिल्यास आपण ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. मिथुन चक्रवर्ती हे भाजपाचे स्टार कँपेनर आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिल्यास आपण ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार आहोत" असं म्हटलं आहे. भाजपाने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे या पदासाठी मिथुन चक्रवर्ती इच्छुक असल्याचे दिसून येते. मिथुन चक्रवर्ती यांच्या रोड शो ला मोठी गर्दी होत आहे. या गर्दीतून लोकांचं पंतप्रधान मोदींवर असलेलं प्रेम दिसून येत आहे. त्यामुळे बंगालमध्ये बदल घडू शकतो असा अंदाज असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.