कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपा नेते प्रलय पाल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आपल्याला फोन करून नंदीग्राममधील विजयासाठी मदत मागितली असल्याचा दावा प्रलय पाल यांनी केला आहे. पाल यांच्या या दाव्याने बंगालच्या राजकारणात चांगलाच खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार शुभेंद्रू अधिकारी लढत आहेत. प्रलय पाल यांनी हा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे.
ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सकाळी मला फोन केला होता. नंदीग्राममध्ये मदत करण्याची विनंती त्यांनी केली होती असं पाल यांनी म्हटलं आहे. या संभाषणाची एक ऑडिओ क्लिपही भाजपाने व्हायरल केली आहे. तर ऑडिओ क्लिपमधील आवाज व्हेरिफाईड नसल्याचं टीएमसीने म्हटलं आहे. "मी त्यांच्यासाठी काम करावं आणि टीएमसीमध्ये प्रवेश करावा असं ममता बॅनर्जींचं म्हणणं होतं. परंतु मी गेल्या अनेक वर्षांपासून शुभेंदू अधिकारी यांच्या कुटुंबासोबत आहे. आता मी भाजपासाठी काम करत आहे" असं पाल यांनी म्हटलं आहे.
"डाव्यांच्या सत्तेच्या काळात अत्याचार वाढले होते. तेव्हा नंदीग्रामच्या जनतेच्यापाठी फक्त अधिकारी कुटुंबच उभं राहिलं होतं. मी कधीच अधिकारी कुटुंबाच्या विरोधात गेलो नाही आणि यापुढेही कधी अशी हिंमत करणार नाही" असं देखील पाल यांनी म्हटलं आहे. नंदीग्राममधील लोकांना टीएमसीने कधीच त्यांचा अधिकार मिळवून दिला नाही. त्यामुळे मी भाजपाची सेवा करत राहणार आहे, असं ममता दीदींना सांगितल्याचंही पाल म्हणाले. अधिकारी निवडून यावेत मन आम्ही जीवाचं रान करू असंही त्यांनी सांगितल्याचं म्हटलं आहे. भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी ट्विट केलं आहे.
"ममता बॅनर्जी यांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रलय पाल यांना फोन करून मदत मागितली आहे. पाल यांना टीएमसीमध्ये अपमानित करण्यात आलं होतं. त्यामुळे ते कुटुंबासह भाजपाला कधीच धोका देणार नाहीत. या सर्व प्रकारामुळे ममता बॅनर्जी नंदीग्राममधून पराभूत होणार हे निश्चित झालं आहे" असं मालवीय यांनी म्हटलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात मुख्य लढत असल्याचे मानले जात आहे. काँग्रेस व डाव्यांच्या आघाडीचेदेखील आव्हान राहणार आहे.
धक्कादायक! कार्यकर्त्याचा मतदानादिवशीच आढळला मृतदेह; भाजपाने केला हत्येचा गंभीर आरोप
केशियारीमध्ये भाजपा कार्यकर्ता मंगल सोरेनचा मृतदेह आढळला आहे. या कार्यकर्त्याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे. "घरात घुसून झोपलेल्या भाजपा कार्यकर्त्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली" असं म्हटलं आहे. रात्री मंगल सोरेन बाहेर झोपला होता, सकाळी त्याचा त्याच ठिकाणी मृतदेह आढळला असं सांगितलं जात आहे. भाजपा उमेदवार सोनाली मुर्मु यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सकाळी असं ऐकायला मिळालं, की बेगमपूर चार नंबर बूथवर एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्याची हत्या करण्यात आली आहे. रात्री तो घराबाहेर झोपला होता, मात्र सकाळी त्याच्या आईला त्याठिकाणी त्याचा मृतदेह दिसला."