रांची - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Elections 2021) अटीतटीचा प्रचार सुरू झाला आहे. गेल्या १० वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस आणि राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये मुख्य लढत होत आहे. ममता बॅनर्जी यांना बंगालच्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपाने (BJP) कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील विविध नेते ममता बॅनर्जी यांच्या समर्थनासाठीही पुढे येत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनीही ममता बॅनर्जींना पाठिंबा देत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. (Sharad Pawar in support of West Bengal Chief Minister Mamata Banerjee)रांचीमध्ये रविवारी झालेल्या पक्षाच्या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकार गैर भाजपाशासित राज्यांमध्ये केंद्रीय संस्था सीबीआय, ईडी यांच्या माध्यमातून त्रास देण्याचे प्रयत्न करत आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीदरम्यानही मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणांचा वापर होत आहे. ममता बॅनर्जींच्या बाजूने भक्कमपणे उभे राहताना शरद पवार म्हणाले की, एक महिला जी गेल्या दहा वर्षांपासून बंगालच्या सत्तेवर आहे. तिच्याविरोधात पंतप्रधान, गृहमंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उभे आहेत. ममतांना सत्तेवरून हटवण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. दुसरीकडे शेतकरी आंदोलनाचे शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही आहे. देश-जग फिरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी २० किलोमीटर प्रवास करू शकत नाही आहेत, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. पश्चिम बंगालसोबत केरळ, तामिळनाडू आणि आसाममध्ये अन्य राजकीय पक्षांविरोधात केंद्रीय सत्तेतील अधिकारांचा गैरवापर केला जात आहे. शरद पवार यांनी सांगितले की, केंद्र सरकार सद्यस्थितीमध्ये केवळ एकच काम करत आहे. जिथे भाजपाची सत्ता नाही तिथे सीबीआय आणि ईडीच्या मदतीने त्रास देण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.
ममता दिदींच्या समर्थनासाठी शरद पवार मैदानात, म्हणाले, एका महिलेला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 4:44 PM
West Bengal Assembly Elections 2021, Sharad Pawar Support Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना बंगालच्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील विविध नेते ममता बॅनर्जी यांच्या समर्थनासाठीही पुढे येत आहेत.
ठळक मुद्देएक महिला जी गेल्या दहा वर्षांपासून बंगालच्या सत्तेवर आहे. तिच्याविरोधात पंतप्रधान, गृहमंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उभे आहेत ममतांना सत्तेवरून हटवण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण ताकद झोकून दिली आहेकेंद्रातील भाजपा सरकार गैर भाजपाशासित राज्यांमध्ये केंद्रीय संस्था सीबीआय, ईडी यांच्या माध्यमातून त्रास देण्याचे प्रयत्न करत आहे