कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असा सामना तेथे रंगताना दिसून येत आहे. विविध वृत्त वाहिन्यांनी ओपिनियन पोल समोर आणले असून, या सर्वांची सरासरी काढली असता तृणमूलची घसरगुंडी व भाजपचा फायदा असे चित्र दिसून येत आहे. डावे पक्ष व कॉंग्रेसची आघाडी स्पर्धेतही नसणार असल्याचे अंदाज यातून वर्तविण्यात आले आहे.
विविध ओपिनियन पोलची आकडेवारी गोळा करून त्या आकडेवारीच्या विश्लेषणातून एका वृत्तवाहिनीने महाओपिनियन पोल मांडला आहे. २०१६ च्या निवडणुकीत तृणमूलला २११ व भाजपला अवघ्या ३ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाओपिनियन पोलनुसार भाजपला सरासरी १३८ जागा मिळतील, तर तृणमूलला १३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. २९४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत बहुमतासाठी १४८ चा आकडा आवश्यक आहे. अशा स्थितीत दोन्ही पक्षांमध्ये बहुमतासाठी चढाओढ असेल.